Sunday, 30 May 2021

लॉकडाऊन अनुभव

    लॉकडाऊन अनुभव.

साधारणपणे २५ मार्च २०२० पासून आपण कोरोना व लॉकडाऊन अनूभवतो आहोत. या काळात आपणस सर्वांनी वेगवेगळे अनुभव घेतले आहेत. काही चांगले तर काही वाईट असे आपण अनूभव घेतले आहेत. आता याच कालावधीत मला आलेला अनुभव. तो चांगला की वाईट योग्य की आयोग्य हे आपले आपण ठरवावे.

माझा मुलगा हा पुणे येथे नोकरीस आहे. लॉकडाऊन मधे तो घरुन काम करत होता. लॉकडाऊन मधे सवलत मिळाले नंतर तो घरी सातारा येथे आला होता व घरुनच लॅपटॉपवर काम करत होता. दरम्यान माझे जावई यांनी जॉब बदललेने ते माझी मुलगी व ३ वर्षे वयाची नातं हे बंगलोरला शिफ्ट होणार होते. नात लहान असल्याने मी व पत्नी त्यांचे बरोबर बंगलोरला जाणार होतो. पुणे येथून रेल्वे रिझर्व्हेशन केले होते. त्यासाठी पुणे येथे जायला हवे होते. मुलांचा फ्लॅट भुगाव पुणे येथे आहे. त्याप्रमाणे ईपास काढून एखादा दिवस आधी पुणे येथे मुलांचे फ्लॅटवर जाऊ असे ठरवले. त्याबाबत मुलाने पुणे येथील त्याचे सोसायटीच्या लोकांना सांगितले तेव्हा त्याला जे ऊत्तर मिळाले ते तेथील लोकांची मानसिकता दाखवणारे होते. पुणे येथील त्याचे सोसायटी मधील लोकांनी मुलाला सांगितले की तुम्ही व तुमची पत्नी यायला हरकत नाही पण तुमचे आई वडील हे कायमस्वरूपी तुमच्या सोबत येथे रहात नाहीत त्यामुळे त्यांना या लॉकडाऊन मधे येथे येता येणार नाही. हे असले ऊत्तर हे काय दर्शवते ? असो नंतर आम्ही पुणे येथील मुलीचे फ्लॅटमध्ये आलो. तेथील सोसायटी मधील लोकांनी फारसे आढेवेढे घेतले नाहीत. तेथे दोन दिवस होतो नंतर विमानाने बंगलोरला आलो.

आता बंगलोरची कथा बंगलोर येथील फ्लॅट बंगलोरला प्रत्यक्ष न येता व्हिडिओ वर फ्लॅट पसंद करुन व जागा मालक यांचेशी फोनवर घरभाडे, डिपॉझीट ठरवले होते. प्रत्यक्ष एकमेकांना भेटलो नव्हतो किंवा पुर्वीची ओळख नव्हती. फ्लॅटची किल्ली आमचे कडे नव्हती. रात्री १२:३० ला बंगलोर येथे उतरलो पण अपरात्री घरमालक यांना त्रास देणे ऊचीत नव्हते म्हणून त्यांना सकाळी ७ वाजेपर्यंत फ्लॅटवर येतो असं सांगितलं व त्याप्रमाणे आम्ही सकाळी ७ वाजता फ्लॅट वर आलो तोपर्यंत घरमालक आलेले. येताना ते आम्हा चौघांसाठी चहा व नातीसाठी दुध बिस्किटे आणली होती. आम्ही १४ दिवस क्वारंटाईन होणार असलेने त्यांनी किल्ली व चहा आमचे कडे दिला. नंतर पुन्हा १० वाजता सर्वांना भरपेट नाश्ता आणून दिला व दुपारी १ वाजता भरपेट जेवण आणून दिले. शेजारी लोकांची ओळख करून दिली. शेजारच्या लोकांनी सुध्दा सांगितले की तुम्ही क्वारटाईन आहात त्यामुळे तुम्ही घरातून पाऊल सुध्दा बाहेर टाकू नका तुम्हाला जे हवे ते सहकार्य आम्ही करु काय पाहिजे ते आम्ही आणून देऊ पण तुम्ही घरात राहून स्वत:ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. त्याप्रमाणे क्वरंटाईन संपेपर्यंत आम्ही कोणीही घराचा उंबरा ओलांडला नाही. जे पाहिजे ते घरपोच मिळणेची सोय करुन दिली. आता आज क्वरंटाईन संपले व आजपासून थोडी मोकळीक मिळेल. 

दोन वेगवेगळी राज्ये दोनी महानगरे एक राजधानीचे शहर तर एक विद्येचे माहेरघर दोन वेगळे अनूभव आपणा बरोबर शेअर केलेत. कोणाबद्दल काही तक्रार नाही. किंवा कोणी कसा विचार करावा हे आपण ठरवू शकत नाही. कोण बरोबर कोण चूक हे ठरवायचा अधिकार नाही . जे मनाला खटकले ते मांडण्याचा प्रयत्न.


Saturday, 6 April 2019

महाभारतातील स्त्रीे व्यक्तीमत्व
महाभारत सर्व भारतीयांच्या मनात आदर व विशेषतः हिंदू धर्मीयांच्या भाव भावनांचे प्रतीक. महाभारत किंवा त्यातील विविध पात्रे माहीत नाहीत अशी व्यक्ती सापडणे हे अत्यंत दुर्मिळ. मानवी जिवनातील भावभावनांचे प्रतिबींब आपणास यात पहायला मिळते. माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरणारे काम,क्रोध,लोभ,मोह,मद, मत्सर हे षड्रिपू जर कुठे एकत्रीत पहायचे असतील तर तुम्ही फक्त महाभारत अभ्यासा तुम्हाला ते पावलोपावली दिसून येतील. हा झाला यातील एक नकारात्मक भाग तर जिवन कसे जगावे याचे तत्त्वज्ञान हे सुध्दा आपणास महाभारत शिकवते. भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर त्यांच्या प्रिय अर्जुनास जी भगवत गीता सांगितली ती एक अलौकिक असा ज्ञानकोश आहे. जी पुढे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्र्वरी रुपात सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत समजावून सांगितली.

अशा या व्यासमुनी यांच्या खंडकाव्याचे अध्ययन करताना मनात काही प्रश्न निर्माण होतात ज्याची उत्तरे मिळत नाहीत. महाभारतातील स्त्री पात्रांचा अभ्यास करत असताना बहूतांशी त्यांच्यावर अन्याय झाला असे वाटते व महाभारतात शेवटी जे महायुद्ध होऊन अनेक राजे, राजपुत्र,शुरवीर सेनापती व लक्षावधी  सैन्य यांचा वध झाला त्या सर्वांस शेवटी स्त्रीलाच जबाबदार धरले गेले. यातून पौराणिक काळापासून असलेली पुरुष सत्ताक पध्दती व एकंदरच समाजात स्त्रीचे नगण्य स्थान व तीला तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती दिसून येते. महाभारता मधील स्त्री पात्रांचा विचार करता प्रामुख्याने खालील स्त्री पात्रांचा विचार करणे आवश्यक वाटते.
सत्यवती, अंबा, अबीका, अंबालीका, कुंती माद्री, गांधारी, द्रौपदी व ऊत्तरा.

सत्यवती
महाभारताचा विचार करता त्याची सुरुवात कोठून करावी असा एक प्रश्न निर्माण होतो. पण सर्वसाधारणपणे राजा शंतनु व सत्यवती यांचे पासून. सत्यवतीचे मुळ नाव मत्स्यगंधा. मत्स्यगंधा हिचे जन्माचे बाबतीत पुराणांमध्ये असे सांगितले आहे की ब्रह्मदेवाने शाप दिला व आद्रीका नामक अप्सरेला माशाचा जन्म मिळाला वसुद्वारा स्थापीत स्त्री गर्भ त्या माशाच्या पोटात होता. एका कोळ्यास तो मासा मिळाला. त्याने तो मासा कापल्यावर त्याचे पोटातून जी बालीका मिळाली तिच्या सर्वांगास माशाचा वास येत असल्याने तिला मत्स्यगंधा असे नाव मिळाले. पुढे ती वयात आल्यावर एकदा पराशर मुनी तिचेवर भाळले व त्यांचे तपसामर्थ्याने त्यांनी माशाच्या वासाची दुर्गंधी दूर केली व तिला अदभुत अशा सुगंधाचे वरदान दिले. त्यामुळे तिचे नाव योजनगंधा असे झाले. तिला सत्यवती म्हणूनही ओळखले जाते.पराशर मुनींनी तिचेशी संबंधाची ईच्छा व्यक्त केली त्यावेळी तिने ती अविवाहित असलेने असमर्थता व्यक्त केली. त्यावर त्यांनी प्रसुतीनंतर सुध्दा तु कुमारी रहाशील असे सांगितले. त्यांनी आपल्या तपोबळावर आसपास धुके निर्माण कले ज्या योगे त्यांचा प्रणय कोणी पाहणे शक्य होणार नाही अशी व्यवस्था केली. पुढे मत्स्यगंधेने एका दिव्य बालकाला जन्म दिला जे जन्मताच मोठे झाले व वेदमहर्षी व्यास म्हणून प्रसिध्द झाले. पुढे एकदा राजा शंतनु शिकारीसाठी जंगलात आले असता ते सत्यवतीवर मोहीत होऊन लग्न करणेची ईच्छा व्यक्त केली. त्यावर सत्यवतीचे पालक वडिलांनी सत्यवतीचे पोटी होणारी संतान ही हस्तीनापूरची सम्राट होणार असेल तर लग्नास संमती मिळेल असे सांगितले. पण शंतनूस गंगापुत्र देवव्रत ऊर्फ भिष्म हा पहिला पुत्र व राज्याचा ऊत्तराधिकारी होता त्यामुळे शंतनू निराष झाला. पण पित्यासाठी भिष्म यांने विवाह न करण्याची प्रतिज्ञा केली व सत्यवती व शंतनू यांचा विवाह झाला. महायोध्दा भिष्म यांनी विवाह न केल्याने व राजपदावर अधिकार सोडून दिल्याने  पुढे अनेक समस्या निर्माण होऊन महाभारत घडले. यामधे भिष्माने विवाह न करण्यामागे सत्यवतीची राजकीय महत्वाकांक्षा आड आली व स्वताचे मुलासच राजपद मिळावे म्हणून तिने सर्वगुण संपन्न भिष्म यांचा अधिकार हिराऊन घेतला असा तिला दोष दिला जातो. तसेच विवाह होणेपुर्वीच पराशर मुनींपासून पुत्र जन्माला घातला त्यामुळे तिचे चारित्र्यावर प्रश्र्न ऊभे केले जातात. वास्तविक पराशर मुनींना जर नकार दिला तर त्यांचे तपसामर्थ्याने शाप मिळण्याची भिती होती हे कोणीच विचारात घेत नाही. तसेच आपल्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलांची मातेस काळजी वाटणे हे नैसर्गिक आहे म्हणून तिची आपल्या मुलाला राजपदाची मागणी समर्थनीय ठरु शकते. पण याला स्त्रीमत्सर असे रुप दिले जाते. व शेवटी महाभारत युध्द होण्यासाठी अनेक व्यक्ती पैकी तिला एक महत्त्वाची व्यक्ती मानले जाते.

अंबा, अंबीका व अंबालीका
सत्यवतीला चित्रांगद व विचित्रविर्य असे दोन पुत्र झाले. चित्रांगद गंधर्वाबरोबर युध्दात मारला गेल्यावर भिष्म विचित्रवीर्य यास हस्तीनापुरच्या गादीवर बसवतो. काशीराजाच्या तिन कन्या अंबा,अंबीका, व अंबालीका यांचे स्वयंरातून भिष्म सर्वांचा पराभव करून तिन्ही कन्यांचे विचित्रविर्य बरोबर लग्न करून देण्यासाठी पळवून आणतो. पण अंबाने भिष्म यास मी तनमनधनाने राजा शाल्व यास वरले असल्याने अन्य कुणाशी विवाह करु शकत नाही असे सांगितले. त्यामुळे भिष्म तिला राज शाल्व याचेकडे पाठवून देतो व अंबीका व अंबालीका याचा विवाह विचित्रवीर्य याचेबरोबर लाऊन देतो. भिष्माने अंबेचे हरण करुन पळवून नेले असल्याने शाल्व अंबेचा स्विकार करत नाही व ती परत भिष्माकडे येऊन त्याला तिच्या बरोबर विवाह करणेची विनंती करते. पण लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतली असल्याने भिष्म तिचे बरोबर लग्न करण्यास असमर्थता व्यक्त करतो. व पुढे अंबेला आपले जिवन संपवणे भाग पडते. आता यात काही दोष नसताना अंबेचे जिवन उध्वस्त होते पण यात भिष्माला दोशी धरले जात नाही. विचित्रवीर्यच्या अकाली मृत्यूमुळे वंश वृध्दी साठी सत्यवती व्यासमुनींना बोलावून नियोग द्वारे संतान प्राप्तीसाठी अंबिका  व अंबालीका यांना बाध्य केले जाते. येथे त्यांच्या ईच्छा आकांक्षा यांना काहीच महत्त्व नाही. कुरुवंशाला वारस देणे एवढेच त्यांचे कार्य. त्यांचेवर अन्याय झाला असे कुणाला वाटत सुध्दा नाही.
कुंती
यादव कुळातील शुरसेन याची कन्या काशीराज याला दत्तक दिल्यावर तिचे कुंती असे नामकरण झाले. हस्तिनापूरचा राजा पंडू यांचेशी विवाह होवून ती हस्तीनापुरची राणी बनते. कुंती चे सर्व आयुष्य म्हणजे एक शोकांतिका आहे. लग्नापुर्वी दुर्वास मुनींनी दिलेल्या मंत्रशक्तीने ती कोणत्याही देवतेचे स्मरण करून पुत्ररत्न प्राप्त करु शकेल असे वरदान लाभते. कुमारी असताना ऊत्सुकतेपोटी सुर्य देवाचे स्मरण करून ती मंत्र म्हणते व कर्ण यांचा जन्म होतो पण ती कुमारी असल्याने ती मुलाला जवळ ठेऊ शकत नाही व त्यामुळे त्या बालकाला एका पेटीत ठेवून पाण्यात सोडून देते. एका सारथ्यास ती पेटी मिळते व तो त्यातील बालकाचे पालन करतो. राजा पंडुच्या हातून एका ऋषी पती-पत्नी यांना शिकारीचे वेळी बाण लागला असतो त्यामुळे त्याला मिळालेल्या शापामुळे तो आपल्या दोन्ही पत्नीशी प्रणय करु शकणार नसतो. त्यामुळे तो राज्य ध‌तराष्ट्र या बंधूकडे सोपवून जंगलात निघून जातो. जंगलात गेल्यानंतर कुंती राजा पंडू यास तिला असलेल्या वरदानाची माहिती देऊन त्याद्वारे आपणास पुत्ररत्न होईल असे सांगते. व त्याप्रमाणे मंत्रशक्तीने धर्म, भीम व अर्जून यांचा जन्म होतो. कुंती आपली सवत माद्री हिला सुध्दा मंत्र शक्ती देते ज्या योगे ती नकूल व सहदेव यांना जन्म देते. पण राजा पंडूस स्त्री मोह आवरत नाही व माद्रीसोबत प्रणय करताच त्याचा मृत्यू होतो. कुंती पाची मुलांना घेऊन पुन्हा हस्तीनापूरला परत येते. येथे राजप्रासादात सुध्दा तिच्या वाट्याला हाल अपेष्टाच येतात. एक तर वैधव्य जीवन व पाच मुलांबरोबर तिला ही त्रास होतो. पुढे पांडवांचे बरोबर वनवासात जिणे तिच्या नशिबी येते. स्वताचा प्रथम पुत्र समोर येऊन सुध्दा ती त्याला समाजासमोर पुत्र म्हणून प्रेम देऊ शकत नाही. शेवटी युध्दात आपल्याच दोन वीरपुत्रात युद्ध होत असताना हतबलपणे पहाण्याशिवाय तिला काही पर्याय उपलब्ध नसल्याने एका मुलाचे हातून दुसऱ्याचा मृत्यू पहाण्यासारखी दुर्दैवी घटना तिच्या नशिबी येते. एकूणच तिचै आयुष्य हे सुखापेक्षा दुःखद घटनांनीच जास्त भरलेले होते असेच दिसून येते.

माद्री
मद्र देशाची राजकन्या व हस्तीनापूरचा राजा पंडू याची द्वितीय पत्नी, नकूल सहदेव यांची माता एवढीच तिची ओळख. संपूर्ण महाभारतात याशिवाय तिला फारसे महत्त्व दिल्याचे आढळून येत नाही. कुंती व पाडूपुत्र याचेवरील अन्याय यामधे तिने तिचे आयुष्य कसे जगले असेल याची साधी चर्चाही कोणी फारशी करत नाही. तर तिच्यावर अन्याय झालाय असे वाटण्याचा प्रश्नच नाही. एकूणच तिचे महाभारतातील स्थान काय हाच प्रश्न मनात येतो.

गांधारी
गांधार सारख्या एका संपन्न देशाची राजकन्या आणी हस्तीनापूरचा सम्राट धृतराष्ट्र याची पत्नी. तिच्या इतकी दुर्दैवी स्त्री संपूर्ण महाभारतच काय अन्य कोणत्याही पौराणिक काव्य अथवा इतिहासात सापडतणार नाही. निव्वळ एक राजकीय सोय व राजकारणासाठी तिचा धृतराष्ट्र सारख्या अंध व्यक्ती बरोबर विवाह लावून दिला जातो. तिच्या त्यागाची महती लोकांना पटवून देणे साठी तिला संपूर्ण आयुष्य दृष्टी असून सुध्दा डोळ्यांवर पट्टी बांधून एका अंध व्यक्ती प्रमाणे आयुष्य कंठावे लागले. नुसते तिच्या त्यागाचे गोडवे गाऊन तिच्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन होईल काय? एखाद्या दृष्टी असलेल्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य हे डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळ्या सारखं जगणं हे किती कष्टप्रद असू शकते हे ज्याच्या वाट्याला असे जगणे येईल तीच व्यक्ती जाणू शकते. इतिहासात तरी असे दुसरे उदाहरण सापडणार नाही. पोटी शंभर पुत्र व त्या सर्वांचे महायुध्दात निधन व शेवटी निपुत्रिक म्हणून मृत्यू यापेक्षा अजून दुर्दैव ते काय असू शकते. कुंतीला फक्त एक पुत्र युध्दात गमवावा लागला होता हे येथे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. येथे कौरव वाईट व पांडव हे चांगले हा विषय नाही तर एका स्त्रीचे द्रृष्टीने आपल्या मुलांचा मृत्यू ही गोष्टी विचारात घेतली आहे. म्हणूनच महाभारतातील अन्याय झालेले पण ज्यांची फारशी दखल न घेतलेल पात्र असेच तिचे वर्णन करावे लागेल.

द्रौपदी
महाभारतातील एक सर्वात महत्त्वाचे व संपूर्ण महाभारत ज्या एका पात्रा भोवती फिरत रहाते किंवा जिच्या मुळेच महाभारत घडले असे सर्रास लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सुशिक्षित, अशिक्षित व ज्याने कधीच महाभारत वाचले नसेल अशा सर्व प्रकारच्या लोकांकडून म्हणले जाते असे एक प्रमुख पात्र. आपण कल्पना करा की जर महाभारतातील द्रौपदी हे पात्रच काढून टाकले तर महाभारतात काय शिल्लक राहील. द्रौपदीच्या आयुष्यात घडलेल्या अनेक अलौकिक घटनांप्रमाणेच तिचा जन्म सुध्दा अशीच अलौकीक घटना आहे. यज्ञातून ती ऊत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी या नावे सुध्दा आळखले जाते. पांचाल नरेश द्रुपद याची कन्या म्हणून तिला पांचाली तसेच राजा द्रुपद याची कन्या म्हणून द्रौपदी या नावाने सुध्दा संबोधले जाते. पांचाल नरेश द्रुपद याने यज्ञातून तिला जन्म दिला तोच मुळी कुरु कुळाचा नाश करणे या एकमेव उद्देशाने. गुरू द्रोण यांचे शिष्यांनी राजा द्रुपद यांचा पराभव करून पांचाल देशाचे दोन तुकडे केले याची सल त्याच्या मनात असलेने कुरुंचा विनाश या एकमेव उद्देशाने द्रौपदीची निर्मीती. म्हणजे तिचा जन्मच एका वाईट उद्देशाने झाला. आता कोणत्याही निर्मीतीचा उद्देशच मुळात वाईट असेल तर निर्माण झालेली वस्तू सुध्दा वाईट ठणारच. व त्यामुळेच पुढे द्रौपदीचे आयुष्यात अनेक दुर्दैवी घडत गेल्या हेच तर रचनाकारांना यातून सुचीत करायचे होते किंवा काय ? अजून एक अतर्क्य म्हणजे द्रौपदीस बालपण नाही. ती उपजताच पुर्ण वाढ झालेली तरुण मुलीचे रुपात जन्मास आली. या अतार्कीक घटनेचा संबंध ती एकाच वेळी पाच पुरुषांची पत्नी झाली या दुसऱ्या अतार्कीक घटनेशी आपण लाऊ शकतो. अन्यथा एका वेळी पाच पुरुषांची पत्नी हे बुध्दीला न पटणारे आहे. अर्जुनाने तिला स्वयंवरात जिंकून आणल्या नंतर माता कुंतीच्या आज्ञे प्रमाणे तिला पाच पाडवांशी विवाह करावा लागतो. भले ती आज्ञा कुंतीने गैरसमजुतीने दिली असली तरी त्याच्या ज्या काही वेदना असतील त्या  तरी या द्रौपदीलाच भोगाव्या लागल्या ही वस्तुस्थिती आहे. येथे रचनाकार एका स्त्रीवर तर अन्याय करतातच पण त्या अन्यायाचे कारण सुध्दा दुसरी स्त्रीच कशी राहील याची काळजी घेताना दिसतात. व कदाचीत यातूनच एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची वैरी असते अशी म्हण प्रचलित झाली असावी. आता एका वेळी पाच पुरुषांची पत्नी असणं हे कोणाही स्त्रीला किती अपमानास्पद असू शकते याचा येथे कोणी विचारच करत नाही.
आता अजून एक घटना म्हणजे युधीष्ठीर व द्रौपदी एकांतात असताना चुकीने अर्जुनाने तेथे प्रवेश करणे व त्यांचे प्रायश्र्चीत्त म्हणून त्याला त्रिदंडी संन्यास घ्यावा लागणे. कोणीही पती-पत्नी एकांतात असताना तेथे अन्य पुरुषाचे अचानक येणे ही स्त्रीसाठी किती लज्जास्पद बाब आहे हे तीच जाणू शकते. पुन्हा अर्जुनाने संन्यास घेणे ही शिक्षा सुध्दा द्रौपदीने ठरवलेल्या नियमानुसार होते. येथेही नकळत बोट द्रौपदीकडे दाखवले आहे.
आता महाभारतातील सर्वात महत्त्वाचा व ज्या मुळे पुढे महायुद्ध घडले तो वस्त्रहरणाचा प्रसंग. द्यूतगृहामधे सर्व काही हरल्यानंतर युधिष्ठिर त्याच्यावतीने द्रौपदीस तेथे पणास लावतो. यातून काय सुचीत होते युधिष्ठिराने सोने,नाणे, जडजवाहीर, स्वत:चे राज्य याचे बरोबर द्रौपदीस पण एक निर्जीव वस्तू समजले काय. आणी पुढचा प्रश्न एखाद्या पुरुषाला इतका अधिकार असतो का की तो आपल्या पत्नीला द्युतामधे पणाला लावू शकेल. युधिष्ठिर तीही खेळी हरतो व नंतर रजस्वला अवस्थेतील द्रौपदीला अपमानास्पद अवस्थेत सभेमध्ये आणले जाते. दुष्यासन तिला भर सभेमधे निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न करतो. श्रीकृष्ण कृपेने तिचे लज्जारक्षण होते. मला एका प्रश्र्नाने कायम अचंबित केले की तेथे एकापेक्षा एक धुरंधर उपस्थित असताना कोणीही साधा विरोध केला नाही. त्यावेळची समाजव्यवस्था इतक्या वाईट स्तराला गेली होती काय की भर सभेत हा प्रसंग घडत असताना कोणीही प्राण पणाला लावून विरोध केला नाही. स्त्रीला एवढीही किंमत नव्हती की तिच्या साठी कोणीतरी जीव धोक्यात घालावा. का जे घडतंय त्यात काही चुकीचे आहे असं कुणाला वाटल नाही की दरबारात असलेले पद प्रतिष्ठा यापुढे स्त्रीची विटंबना ही कुणाला फारशी महत्त्वाची वाटली नाही. पुढे यातूनच विनाशकारी असे महायुद्ध घडले व ज्यात मोठा नरसंहार होऊन लाखो स्त्रियांना वैधव्य आले व त्या सर्वांस कारणीभूत द्रौपदीसच धरले गेले.
मी अशा अगदी मोजक्या स्त्री व्यक्तीरेखांचा येथे विचार केलाय. संपूर्ण महाभारतात या वितीरिक्त अभिमन्यू पत्नी ऊत्तरा, कर्णपत्नी वृशाली अशा कित्येक व्यक्तीरेखा असतील ज्याचा कधी कुठे फारसा उल्लेखही कोणी  केला नसेल तर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा काय विचार होणार. पण कोठेतरी त्यावेळची समाज व्यवस्था व एकूणच स्त्रीयांकडे पहायचा द्रृष्टीकोन याबाबत मनात प्रश्र्नचिन्ह निर्माण करतो एवढे निश्चित.

सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा.
३१ जुलै २०१८

टीप:- हा लेख हा महाभारतकालीन समाज व्यवस्था व त्यावेळची स्त्रियांकडे पहाण्याची मानसीकता या दृष्टीकोनातून लिहीला आहे. कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही.

Friday, 29 March 2019

वृध्दपण कसे आनंदी करावे

वृध्दपण कसे आनंदी करावे

मानवी जिवनाचे साधारण चार टप्पे मानले जातात. बालपण, तारुण्य, प्रौढत्व व वार्धक्य. यामधे सर्वसामान्यपणे प्रौढत्वा पासूनचा काळ वयाच्या पन्नाशी नंतर समजला जातो तो साधारण वयाच्या सत्तरी पर्यंत व त्यानंतर वृध्धापकाळ समजला जातो. ह्याच काळातील व्यक्ती ही जेष्ठ नागरिक म्हणून संबोधली जाते. यातील ५० ते ६० वर्षे या काळात व्यक्ती बऱ्यापैकी कामकाज नोकरी व्यवसाय करत असते त्यामुळे ६० व्या वर्षी निवृत्त झालेल्या व्यक्तीस समाजामध्ये जेष्ठ नागरिक असे म्हटले जाते.

पुर्वीच्या काळाच्या तुलनेत आता वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने आयुर्मान वाढले आहे. व संपूर्ण जगात दिवसेंदिवस जेष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. नवीन पिढीला मार्गदर्शक म्हणून जेष्ठ नागरिक हे समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहेत व ते नवीन पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात. त्याचबरोबर अशा जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही समाज व शासन अशी दोघांची जबाबदारी आहे. या साठी सुदृढ आणि निरोगी कुटूंब व्यवस्था असावी लागते. पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती व घरातील जेष्ठांची काळजी ही कुटुंबातील तरुण पिढी घेत होती. पण दिवसेंदिवस ही परिस्थिती आता बदलत आहे व विभक्त कुटुंबपद्धती ही वस्तुस्थिती बनली आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांच्या नवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत. मुलगा नोकरी निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये स्थाईक झाला आहे तर आई वडील त्यांच्या घरी अशी ऊदाहरणे सर्वत्र पहायला मिळतात. आपल्या देशात सरकारी पातळीवर शासन जेष्ठ नागरिकांच्या साठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. पण एकंदरीत आर्थीक परिस्थिती विचारात घेता त्यास मर्यादा येतात. त्यामुळे आपला वृध्दापकाळ आनंदाने घालविण्यासाठी प्रत्त्येक जेष्ठ नागरिकांनी काही बाबतीत स्वताच काळजी घेणे आवश्यक आहे.

आता यातील पहिला महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक शिस्त होय. आपण निवृत्त होण्यापूर्वी नोकरी व्यवसाय करत असतानाच आपली निवृत्ती नंतरची आर्थीक सोय करुन ठेवणे. त्यामुळे निवृत्ती नंतर पेन्शन नसल्यास कोणावरही अवलंबून रहावे लागणार नाही. निवृत्तीनंतर मिळालेला पैसा जास्त व्याजाचे लोभापायी असुरक्षित ठिकाणी कधी गुंतवणूक न करणे. त्यामुळे व्याज थोडेसे कमी मिळेल पण मुदलात घाटा येणार नाही व आपले दैनंदीन जीवन सुरळीत चालू राहील. यानंतर तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शारीरिक स्वास्थ्य. त्यासाठी नियमीत व्यायाम, योगासने व वेळच्यावेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व जी औषधे सांगीतली असतील ती न चुकता घ्यावी म्हणजे स्वत:ला व आपल्या मुळे  अन्य कोणालाही त्रास होणार नाही. अशा प्रकारे स्वताची स्वत: काळजी घेतल्यास आपले शरीर स्वास्थ्य उत्तम राहील. यानंतर तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कौटुंबिक संबंध. आपल्या मुलाचे लग्न झाले असेल तर त्याच्या संसारात फार ढवळाढवळ न करणे. एखाद्या बाबतीत सल्ला विचारला तर जरूर द्यावा पण कायम लुडबुड करु नये. शरीरप्रकृती ऊत्तम असेल तर घरातील छोटी मोठी कामे जरुर करावीत त्यामुळे शारिरीक हालचाल होऊन व्यायाम होईल मुलगा व सून यांना घरातील कामास हातभार लागेल. त्यामुळे आपोआपच घरातील वातावरण खेळकर व आनंदी राहील. आपणास जर सामाजिक कामाची आवड असेल तर अशा संस्थाशी संपर्क ठेवून शक्य तेवढी मदत करावी. संगीत किंवा नाटक यांची आवड असेल तर अशा कार्यक्रमांस आवर्जून उपस्थित रहावे. त्यामुळे आपले तन व मन प्रफुल्लित राहील.
आपला वृध्दापकाळ किती आहे हे कोणीही सांगू शकत नाही, पण परमेश्वराने जे आयुष्य आपणास दिले आहे ते आनंदात जाईल याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.  प्रत्येकाने जर स्वत:ची स्वत: वरीलप्रमाणे काळजी घेतली तर आपला वृध्दापकाळ तो आनंदात व सुखासमाधानाने घालवू शकेल.

सुरेश काळे
सातारा
९८६०३०७७५२

Wednesday, 27 March 2019

तो आती ती

तो आणी ती

आयुष्यात काही वेळा असे का असा आपल्याला प्रश्न पडतो पण त्याचे ऊत्तर कुणालाच ठाऊक नसते. तो आणी ती एक छान जोडी. तिला वगळून त्याचा किंवा त्याला वगळून तिचा आपण विचार सुध्दा करू शकत नाही इतके ते एकमेकांशी एकरुप झालेले असतात. तथापि आपण जर दोन्हीही व्यक्तींचा स्वतंत्रपणे अभ्यास केला तर आपल्याला आश्र्चर्य वाटल्या शिवाय रहात नाही. तो बराचसा अबोल तर तीचीअखंड बडबड चालू असते. तिला नाविन्याची हौस तर तो परंपरागत विचारसरणी असलेला. ती ऊत्तम खेळाडू तर तो फक्त एक प्रेक्षक. तिला घरगुती संसारीक दुरदर्शन मालिका बघायला आवडतात तर तो फक्त क्रिकेटची म्याच पहात बसणार.तिला घर निटनेटके ठेवायला आवडते तर तो जागोजागी पसारा करुन ठेवणार. अशा एक ना अनंत विसंगत बाजू आपल्याला पहायला मिळतात. मग प्रश्न असा पडतो कि दोघांच्या विचारसरणीत ईतकी भिन्नता असताना दोघांना एकत्रित पहाताना कोणालाच कसे विसंगत आढळून येत नाही व तो व ती एक आदर्श जोडी का वाटते. आता याचे ऊत्तर शोधत असताना असे आढळते की त्यांच्यात कितीही फरक असला तरी त्यांचे एकमेकांशी असलेले प्रेमाचे नाते व एकमेकांवर असलेला अतूट विश्र्वास.कारण संसार हाच मुळी एकमेकावरील प्रेम व विषश्र्वासावर अवलंबून असतो व एकमेकाप्रती आदरभाव व समर्पण  हिच खरी यशस्वी संसाराची गुरुकिल्ली आहे.तिला माहित आहे. की त्याला क्रिकेटची आवड आहे पण ती मुद्दाम त्याला डिवचण्यासाठी संसारी मालिका लावते. त्यालाही हे चिडवणे मनातून आवडत असते पण वरवर तो चिडल्याचा आव आणतो पण अधूनमधून चानेल बदलून तो तिच्यासह त्या घरगुती मालीकेचा आनंद घेत असतो. तीसुध्दा अधुन मधून त्याला साथ देत असते. संसारीक जिवन हे असेच असते. दोघांची विचारसरणी, आवड जरी वेगवेगळी असली तरीही एकमेकासाठी आपल्या आवडीला दोघांनी थोडीशी मुरड घातली व आपल्या सहचाऱ्याचा त्याच्या आवडी निवडीचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचा संसार आनंदाने फुलून जातो. ऊलट प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले तर जागोजागी आपणास एकतर विभक्त झालेली किंवा ओढूनताणून संसार चालवणारी जोडपी पहावयास मिळतील. यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करणे आवश्यक आहे तसे झाल्यास जगात सर्वत्र सुखी व आनंदी कुटुंब दिसून येतील व भारतीय संस्कृती बद्दल आपण सार्थ अभिमानाने आपल्या संस्कृतीचे महत्व जगाला पटवून देवुन आपला देश, धर्म संस्कृती याचे रक्षण करुन जगासमोर आदर्श निर्माण करण्यात यशस्वी होऊ.

सुरेश काळे
सातारा
मो.९८६०३०७७५२

Monday, 25 March 2019

प्रणय जेष्ठांचा

प्रणय जेष्ठांचा

लेखाचे शिर्षक वाचून थोडे चक्रावलात ना ? हे असेच होते. मुळात आपल्या समाजात प्रणय या विषयावर बोलणेच जिथे अनैतीक समजले जाते तिथे जेष्ठ व्यक्तींच्या प्रणयाची चर्चा करणे हे महापापच समजले जाईल. मुळात जेष्ठ व्यक्ती प्रणय करतात किंवा त्यांना एकमेकांचा सहवास आवडतो व ती एक मानवी शरिराची नैसर्गिक गरज आहे हेच मुळी आपल्याकडे मान्य केले जात नाही. त्याबाबत नुकताच आलेला अनुभव.
मी व माझी पत्नी आमच्या नातीला घेऊन बागेत गेलो होतो. बंगलोर सारखे मोठे शहर जेथे भारतातील वेगवेगळ्या भागातील मुले मुली नोकरी निमित्ताने रहात असतात. त्यांचे पालक अधून मधून येत असतात. माझी पत्नी नातीला जवळच घसरगुंडीवर खेळवत होती व मी बाजूला एका बाकावर बसलो होतो. मला माझ्या पाठीमागे मराठीमध्ये दोन बायका बोलत असल्याचे जाणवले तर पाठीमागील बाकावर माझ्यासारख्याच दोन मराठी भाषीक  जेष्ठ बायका बोलत होत्या. आता बंगलोर हे एक पर्यटन स्थळ असल्याने तेथे भारतीय लोकां प्रमाणे परदेशातील पर्यटक सुध्दा येत असतात. तेवढ्यात त्या दोन बायकांच्या समोरून एक युरोपियन जेष्ठ कपल गेले. दोघेही मस्तीत एकमेकांचा हातात हात घेत चालले होते. त्या युरोपियन स्त्रिने तिच्या जोडिदाराच्या कानात काही तरी सांगितले तर त्यावर त्याने हसून तिच्या गालाचे चुंबन घेतले व ती दोघे हसत हसत हातात हात घालून पुढे गेले. ते पाहून एक बाई दुसरीला “ बाई बाई बाई काय मेलं वागणं, बघीतलस ना, ना जनाची ना मनाची लाज. आपल वय काय? आपण करतोय काय काही म्हणजे काही धरबंध नाही.” दुसरी बाई “ नाही तर काय, मला तर बघूनच अगदी शरमल्या सारखं झालंय. आपल्याला बघायला नको वाटतय ते मस्त हातात हात घालून फिरतायत.
आता त्या दोघी मराठी भाषीक बाजूला बरेचसे कानडी भाषीक त्यामुळे त्या अगदी बिनधास्त बोलत होत्या व मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होतो. व त्यांचे बोलणे मला विचीत्र वाटत होते. आपले वय झाले साठी ऊलटली म्हणजे आपल्याला आपल्या पत्नीवर प्रेम करण्याचा अधिकार सुध्दा नाही. आपण तिचा हात हातात घेऊ शकत नाही प्रेमाने तिच्याशी मन मोकळे बोलू शकत नाही. तिला प्रेमाने जवळ घेऊ शकत नाही. हे सगळच जरा विचीत्र होते व माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे होते. आता पुर्वीची परिस्थिती राहिलेली नाही. चांगल्या वैद्यकीय सुविधा असल्याने माणसांचे आयुर्मान वाढले आहे. ऊत्तम वैद्यकीय सुविधा तसेच चांगले खाणेपिणे यामुळे निवृत्तीचे वेळी तब्येत ठीक असते. त्यामुळे उतारवयात सुध्दा जेष्ठ नागरिक चांगले हिंडू फिरु शकतात. ऊत्तम आरोग्य, स्वताचे स्वतंत्र घर यामुळे ते शांतपणे जिवन जगू शकतात. पण त्यांच्या शारीरिक गरजांचे काय त्याबद्दल तर बोलणही पाप समजले जाते. वास्तविक याच वयात ते बऱ्याचशा घरगुती जबाबदारीतून मुक्त झालेले असतात व जास्त मोकळेपणाने ते प्रणयाचा आनंद घेऊ शकतात. पण आपल्या देशात जिथे सेक्स हा शब्द उच्चारणे देखील वाईट समजले जाते तिथे ज्येष्ठांना सुध्दा कामेच्छा असू शकते याचा कोणी विचार सुध्दा करणार नाही. ज्येष्ठांना सुध्दा एकांताची गरज असते त्यांना सुध्दा कामेच्छा असू शकते याचा विचार सुध्दा कुणी करत नाही. वास्तविक सेक्स व खोडकरपणा खट्याळपणा या गोष्टी आयुष्यात खूप गरजेच्या आहेत. त्यामुळे उतारवयातील आयुष्य हे आनंददायी होते. पण आपल्याकडे यांचा जेष्ठांचे बाबतीत विचार करणं सुध्दा पाप समजले जाते.
वास्तविक जर तुमची तब्येत ठणठणीत असेल, तुमचं खाणं पिणं व्यवस्थीत असेल व जर तुम्ही चांगले ऍक्टीव्ह असाल तर सेक्स मध्ये सुध्दा  ऍक्टीव्ह राहू शकता. भले तरुण वयातील जोश नसेल पण तुम्ही त्याचा आनंद नीश्र्चीतच घेऊ शकता. आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या शास्त्रीय संशोधनात आढळून  आले की जेवढे तुम्ही सेक्स मध्ये ऍक्टीव्ह असाल तेवढे तुमचे शरीर स्वास्थ्यही ऊत्तम रहाते. तुमच्या शरीरात जे हार्मोन्स निर्माण होतात त्याने तुमचे बी.पी. नॉर्मल रहात असते. तुम्ही तुमच्या वयाच्या प्रमाणात जर सेक्स मध्ये ऍक्टीव्ह असाल तर  हृदयस्वास्थ्य हे सुध्दा चांगले रहाते. पण आपल्याकडे जेष्ठ व्यक्तींचे असे ऍक्टीव्ह असणे  सुध्दा चर्चेचा व कुचेष्टेचा विषय होतो.
खरे पहाता उतारवयातील सेक्स अथवा प्रणय नुसता शारीरिक नव्हे तर तो तुम्हाला मानसीक दृष्टीने सुध्दा उपयुक्त आहे. त्यामुळे तुमचे मानसीक आरोग्य चांगले राहते. पती पत्नी दोघेही त्यांचे आयुष्य अधिक आनंददायी घालवून आनंद मिळवू शकतात. अर्थात यासाठी सुध्दा मुले समंजस असायला हवीत व त्यांनी  आपल्या आई वडिलांना सुध्दा एकांताची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जिवनाच्या ऊत्तरार्धात जितके तुम्ही आनंददायक पध्दतीने रहाल तितक्या व्याधी तुमच्या पासून दूर पळतात. तेव्हा सर्व ज्येष्ठांनो मस्त आनंदाने रहा व आपले  जिवन आनंदमय करा.

सुरेश काळे
हो.९८६०३०७७५२
सातारा.

Sunday, 24 March 2019

सुख आणि दुःख

         सुख आणि दुःख

समर्थ सांगून गेलेत जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तुमची शोधून पाहे. तसा विचार करायला गेलो तर कोणीच सुखी मिळणार नाही. कारण प्रत्येकाला काही ना काही तरी दु:ख हे असतेच. सुख हे जसं मानण्यात आहे तसं दु:खही मानण्यात आहे. सुख हे तुमच्या वृत्तीवर अवलंबून आहे. तुम्ही जिवनाकडे कोणत्या दृष्टीने पहाता यावर ते अवलंबून असते. तुम्ही जिवनाकडे जर कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पहात असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुख आढळून येईल. पण जर तुमचा दृष्टीकोनच जर नकारात्मक असेल व त्याच दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे पहात असाल तर तुम्हाला कशातच सुख दिसणार नाही. व तुम्ही निराश व दु:खी व्हाल.
सुखी होण्यासाठी फार काही लागत नाही फक्त तुमचा जिवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. तो सकारात्मक असेल तर तुम्ही सुखी असाल. पण दु:खाचे तसे नाही. त्यासाठी भरपूर कारणे आढळून येतील. आसुया, मत्सर, निराशा ही काही महत्त्वाची कारणं सांगता येतील. पण त्याचबरोबर किंवा त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे तुलना व मी येथे फक्त त्याच कारणाचा विचार केला आहे. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आपण जर तुलना करून पहात बसलो तर कायम दु:खच वाट्याला येण्याची शक्यता असते. तुलना करताना आपण सारासार विवेकबुद्धी बाजूला ठेवून भावनिक होऊन विचार करतो. अशावेळी केलेला विचार काही वेळा अविचार ठरु शकतो.
मी नोकरी करीत होतो. माझे काम मी प्रामाणिकपणे करत होतो. पण एका ठरावीक स्टेजवर मी थांबलो पुढे मला पदोन्नती मिळाली नाही. व माझ्या नंतर आलेले माझ्या पुढे निघून गेले. अशा वेळी विचार करताना मी विचार केला की माझ्या पेक्षा त्या व्यक्तीकडे काही तरी गुण जास्त असतील व त्यामुळे ती व्यक्ती जास्त यशस्वी झाली. त्याऐवजी मी जर माझ्यावर अन्याय झालेला आहे असा विचार केला असता तर मी दु:खी झालो असतो. पण मी दुसरी व्यक्ती माझ्यापेक्षा थोडी अधिक चांगली असेल असा सकारात्मक विचार केल्याने मला  खुप वाईट वाटले नाही. मानवी स्वभावानुसार थोडावेळ वाईट वाटले जे स्वाभावीक होते. पण विचार सकारात्मक ठेवल्याने अतीव दुःख वा निराश होऊन त्यातच भरकटून गेलो नाही.
आपल्या कडे एक म्हण आहे “शेजारणीने घेतली सरी म्हणून गळ्यात बांधली दोरी” व ही म्हण बऱ्याच वेळा महीलांना लागू होते. प्रत्येक गोष्टीत शेजारच्या महीलेशी बरोबरी करायला जातं हे बहूधा दुःखाला कारणीभूत ठरते. माझ्या ओळखीच्या कुटूंबातील एका मुलीचे लग्न होते. तिला मस्त महिना दोन लाख पगारवाला नवरा मिळतो. स्वत:च्या मोठ्या फर्नीश्ड फ्लॅट मध्ये ती रहात असते. नंतर तिच्या एका मैत्रिणीचे लग्न होते. तुलनेत तिच्या नवऱ्याला पगार कमी असतो. पण तिला आपल्या मैत्रीणीप्रमाणे पॉश फ्लॅट मध्ये रहायला मिळावे अशी तिची अपेक्षा असते. येथे आपणास तुलना दिसून येते. त्यामुळे मैत्रीणीसारखे आपण चांगल्या मोठ्या फ्लॅटमध्ये आपण राहू शकत नाही म्हणून ती दु:खी होते. वास्तविक तिने जर तुलना न करता विवेकबुद्धी वापरुन विचार केला असता व आपल्या पतीच्या ऊत्पन्नाचा विचार करुन अपेक्षा ठेवल्या असत्या तर ती आनंदात राहीली असती.
आता त्या मैत्रीणीने जर तिच्या कलागुणांचा विचार करून व त्याचा वापर केला तर तिही आपले ऊत्पन्न वाढवून चांगले आनंदी जीवन जगू शकते पण त्यासाठी थोडेफार कष्ट केले पाहिजेत व थोडा धीर धरला पाहिजे. सर्व माणसाचं हे असंच असते. जे आपल्याकडे आहे त्याचा विचार न करता माणूस  जे नाही त्याचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवतो व पर्यायाने दु:खी होतो. यासाठी जे नाही त्याचा विचार करून निराश व दु:खी होण्यापेक्षा आपल्याला परमेश्र्वराने जे दिले आहे त्याचा आनंद घेतला तर आपले सर्वांचेच जीवन हे अधिक आनंदमय सुखी होईल.

सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा.
२३ मार्च २०१९

Friday, 22 March 2019

गांधारी

               गांधारी
गांधारी महाभारतातील एक महत्त्वाचे पण दुर्लक्षित पात्र. गंधार देशाची स्वरुपसुंदर राजकन्या दुर्दैवाने एका अंध राजाची पत्नी होते व संपुर्ण जिवन डोळे असूनही निव्वळ पती निष्ठा म्हणून डोळ्यांवर पट्टी बांधून अंध स्वरुपात व्यतीत करते. डोळे असून अंध म्हणून आयुष्य व्यतीत करताना तिला ज्या वेदना सहन कराव्या लागल्या असतील त्यांची तुम्ही आम्ही फक्त कल्पना करु शकतो. एखादी अंध व्यक्तीच तिचं दु:ख तिची वेदना समजू शकते.
जेवढा म्हणून आपण गांधारीचा विचार करायला लागतो तेवढं आपण तिच्या वेदनेच्या अधिक जवळ जातो. एका देशाची राजकन्या म्हणून तिच्या काही भाव भावना असतील. तिच्याही स्वप्नातल्या राजकुमारवर तिचं मन आकृष्ट झाले असेल. तिलाही एखाद्या तेजस्वी राजाची राणी होण्याची आकांक्षा असेलच. मग तिच्या ईच्छा आकांक्षांचे काय झाले, व का असे अंधकारमय जीण तिच्या नशिबी आले. याचा कोणी विचारच करत नाही. संपूर्ण महाभारतात तिला एक महान पतीव्रता असे म्हणून बोळवण केली असेच वाटते.
महाभारत निश्र्चीतच आपले एक महाकाव्य आहे. व त्यामधून भगवान श्रीकृष्णांनी भगवतगीता रुपाने महान तत्वज्ञान मानवास दिले व जिवनाचा महामंत्र दिला आहे हे सत्य आहेच. पण मग गांधारीवर जो अन्याय झाला त्याचा आपण विचार करणार की नाही हा प्रश्र आहे. आजही समाजात अशा अनेक गांधारी आपले जीवन व्यतीत करताना दिसतात. मुळात गांधारीचा धृतराष्ट्रा बरोबर झालेला विवाह हा एक राजकारणाचा भाग होता. हस्तीनापूर सारख्या सम्राटाकडून मागणी घातली गेल्यानंतर त्यास नकार देण्याची हिम्मत गांधार राजाची नव्हती व त्याचबरोबर नाही म्हणले तरी हस्तीनापूर सारख्या मोठ्या राजघराण्याशी जुळणारे नाते आजच्या भाषेत सोयरीक यांचा मोह गांधार नरेशास झालाच नसेल असे नाही. आजही जर एखाद्या मंत्र्याने किंवा आमदारांने जर त्याच्या मुलासाठी एखाद्या वधू पित्याला मागणी घातली तर
तिला झिडकारण्याचे धाडस किती वधू पिता दाखवतील. मंत्री आमदार यांचा सध्या असलेला रुबाब व काही अंशी दरारा त्याला हे धाडस करु देणार नाहीच त्याचबरोबर अशा राजकीयदृष्ट्या फायद्याच्या सोयरीकीचा मोहही त्याला होणारच. मग अशा वेळी त्या मुलीला विचारण्याची तिचा होकार आहे का याची साधी विचारपूस सुध्दा केली जात नाही व ती मुलगी डोळे असून सुद्धा जे काही आपल्या घरच्या लोकांनी ठरवले असेल त्याच्यापुढे मान करुन वरमाला स्विकारते व गांधारी सारखं आपलं आयुष्य व्यतीत करते.
गांधारीने शंभर मुलांना जन्म दिला असं महाभारतात दिसून येते. आता मुळात कोणतीही स्त्री १०० मुलांना जन्म देणं वैज्ञानिक दृष्ट्या शक्य वाटत नाही. तरीही आपण मान्य करु की तिला जी काही दैवी शक्ती तिच्या तपश्चर्येमुळे प्राप्त झाली होती. तो एक दैवी चमत्कार होता पण आता सुध्दा काही सुशिक्षित अपवाद सोडले तर एकापाठोपाठ एक मुलांना जन्म घालणारे महाभाग आपल्याला समाजात दिसून येतात. वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुली पाठोपाठ मुली झाल्या तरी मुलगा हवा म्हणून त्या स्त्रिला बाळंतपणाच्या वेदना देणारे महाभाग अगदी सुशिक्षित समाजातही आढळून येतात. येथे त्या स्त्रिच्या अनुमतीची गरजसुध्दा भासत नाही तर तिला होणाऱ्या त्रासाची कोण चिंता करणार. यामध्ये त्या स्त्रिचा होणारा कोंडमारा कोणालाही दिसत नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही वेळा एखादी स्त्रीच सासूच्या भूमिकेतून आपल्या सुनेला मुलगा होण्यासाठी भावनिक दृष्टीने बोलून अशा वारंवार बाळंतपणाच्या फेऱ्यात अडकले व ती स्त्री मुकाट्याने ते सर्व सोसत रहाते.
गांधारीला शंभर पुत्र झाले पण ते सर्व वाममार्गी होते त्यामुळे युध्दमधे ते सर्व मारले गेले व शेवटी तीला निपुत्रीक म्हणून आपले जिवन व्यतीत करणे क्रमप्राप्त झाले. येथे पुत्रांची संख्या किती हे महत्त्वाचे नाही तर सद्वर्तनी पुत्ररत्न असणे किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते. आताच्या काळात असं धर्मयुध्द होत नाही पण कौरवांच्या कुळातील दुर्जन पोटी जन्म घेतात व आपल्या वर्तनाने आपल्या मातापित्यांना मनस्तापाला कारणीभूत होतात. काही गैरमार्गाने जातात तर काही आपल्या मातापित्यांना वृध्दश्रमाची वाट दाखवतात. म्हणजे काय तर मुलगा असूनही एका अर्थाने ते निपुत्रीकच होतात. शंभर मुलांना जन्म देणारी महाभारतातील गांधारी आणि आधुनिक युगातील मुलाकडून वृध्दश्रमात ढकलली जाणारी स्त्री दोघींचेही दु:ख तेच आहे.
आपण म्हणतो काळ बदललाय. पण काळ बदलला म्हणून वृत्ती बदलली का हा खरा प्रश्न आहे. महाभारत हजारो वर्षांपूर्वी घडले पण त्यातील पात्रे नव्या रुपात येथे जन्म घेताना दिसतात. दुर्योधन दुषासन नव्य रुपात येथे जन्म घेताना दिसतात. तेथे द्रौपदीचे मदतीला श्रीकृष्ण धाऊन आला होता. या कलीयुगात अशा श्रीकृष्णाची वाट पाहणे धोक्याचे होईल. गांधारी प्रमाणे डोळे मिटून शांत राहू नका तर डोळे उघडे ठेवून वाटचाल करा. गांधारी प्रमाणेच महाभारतातील भिष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य अशा दिग्गजांनी डोळ्यांवर राजनिष्ठ रहण्याची पट्टी बांधली होती. व त्यामुळेच पुढे महाभारतातील भिषण युद्ध व नरसंहार झाला.
रामायण महाभारत हे आपले महान ग्रंथ आहेतच. पण आपण त्याकडे गांधारी बनून आंधळेपणाने न पहाता डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. महाभारतातील प्रत्येक पात्र आपल्याला शिकवण देत असते आपण फक्त डोळे उघडे ठेवून ती शिकवण अंगीकृत करणे हे महत्त्वाचे असते. गांधारीचा विचार त्या दृष्टीकोनातून करुन विषेषत: स्त्रीयांनी डोळ्यांवर पट्टी न बांधता डोळसपणे आपल्या आयुष्याकडे पहावे कोणताही निर्णय भावनिक दृष्टीने न घेता डोळसपणे घेणे ही आजच्या काळाची गरज आहे असे म्हणणे अधिक योग्य होईल.

सुरेश काळे
हो.९८६०३०७७५२
सातारा.