सुख आणि दुःख
समर्थ सांगून गेलेत जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तुमची शोधून पाहे. तसा विचार करायला गेलो तर कोणीच सुखी मिळणार नाही. कारण प्रत्येकाला काही ना काही तरी दु:ख हे असतेच. सुख हे जसं मानण्यात आहे तसं दु:खही मानण्यात आहे. सुख हे तुमच्या वृत्तीवर अवलंबून आहे. तुम्ही जिवनाकडे कोणत्या दृष्टीने पहाता यावर ते अवलंबून असते. तुम्ही जिवनाकडे जर कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पहात असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुख आढळून येईल. पण जर तुमचा दृष्टीकोनच जर नकारात्मक असेल व त्याच दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे पहात असाल तर तुम्हाला कशातच सुख दिसणार नाही. व तुम्ही निराश व दु:खी व्हाल.
सुखी होण्यासाठी फार काही लागत नाही फक्त तुमचा जिवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. तो सकारात्मक असेल तर तुम्ही सुखी असाल. पण दु:खाचे तसे नाही. त्यासाठी भरपूर कारणे आढळून येतील. आसुया, मत्सर, निराशा ही काही महत्त्वाची कारणं सांगता येतील. पण त्याचबरोबर किंवा त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे तुलना व मी येथे फक्त त्याच कारणाचा विचार केला आहे. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आपण जर तुलना करून पहात बसलो तर कायम दु:खच वाट्याला येण्याची शक्यता असते. तुलना करताना आपण सारासार विवेकबुद्धी बाजूला ठेवून भावनिक होऊन विचार करतो. अशावेळी केलेला विचार काही वेळा अविचार ठरु शकतो.
मी नोकरी करीत होतो. माझे काम मी प्रामाणिकपणे करत होतो. पण एका ठरावीक स्टेजवर मी थांबलो पुढे मला पदोन्नती मिळाली नाही. व माझ्या नंतर आलेले माझ्या पुढे निघून गेले. अशा वेळी विचार करताना मी विचार केला की माझ्या पेक्षा त्या व्यक्तीकडे काही तरी गुण जास्त असतील व त्यामुळे ती व्यक्ती जास्त यशस्वी झाली. त्याऐवजी मी जर माझ्यावर अन्याय झालेला आहे असा विचार केला असता तर मी दु:खी झालो असतो. पण मी दुसरी व्यक्ती माझ्यापेक्षा थोडी अधिक चांगली असेल असा सकारात्मक विचार केल्याने मला खुप वाईट वाटले नाही. मानवी स्वभावानुसार थोडावेळ वाईट वाटले जे स्वाभावीक होते. पण विचार सकारात्मक ठेवल्याने अतीव दुःख वा निराश होऊन त्यातच भरकटून गेलो नाही.
आपल्या कडे एक म्हण आहे “शेजारणीने घेतली सरी म्हणून गळ्यात बांधली दोरी” व ही म्हण बऱ्याच वेळा महीलांना लागू होते. प्रत्येक गोष्टीत शेजारच्या महीलेशी बरोबरी करायला जातं हे बहूधा दुःखाला कारणीभूत ठरते. माझ्या ओळखीच्या कुटूंबातील एका मुलीचे लग्न होते. तिला मस्त महिना दोन लाख पगारवाला नवरा मिळतो. स्वत:च्या मोठ्या फर्नीश्ड फ्लॅट मध्ये ती रहात असते. नंतर तिच्या एका मैत्रिणीचे लग्न होते. तुलनेत तिच्या नवऱ्याला पगार कमी असतो. पण तिला आपल्या मैत्रीणीप्रमाणे पॉश फ्लॅट मध्ये रहायला मिळावे अशी तिची अपेक्षा असते. येथे आपणास तुलना दिसून येते. त्यामुळे मैत्रीणीसारखे आपण चांगल्या मोठ्या फ्लॅटमध्ये आपण राहू शकत नाही म्हणून ती दु:खी होते. वास्तविक तिने जर तुलना न करता विवेकबुद्धी वापरुन विचार केला असता व आपल्या पतीच्या ऊत्पन्नाचा विचार करुन अपेक्षा ठेवल्या असत्या तर ती आनंदात राहीली असती.
आता त्या मैत्रीणीने जर तिच्या कलागुणांचा विचार करून व त्याचा वापर केला तर तिही आपले ऊत्पन्न वाढवून चांगले आनंदी जीवन जगू शकते पण त्यासाठी थोडेफार कष्ट केले पाहिजेत व थोडा धीर धरला पाहिजे. सर्व माणसाचं हे असंच असते. जे आपल्याकडे आहे त्याचा विचार न करता माणूस जे नाही त्याचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवतो व पर्यायाने दु:खी होतो. यासाठी जे नाही त्याचा विचार करून निराश व दु:खी होण्यापेक्षा आपल्याला परमेश्र्वराने जे दिले आहे त्याचा आनंद घेतला तर आपले सर्वांचेच जीवन हे अधिक आनंदमय सुखी होईल.
सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा.
२३ मार्च २०१९
No comments:
Post a Comment