Saturday, 6 April 2019

महाभारतातील स्त्रीे व्यक्तीमत्व
महाभारत सर्व भारतीयांच्या मनात आदर व विशेषतः हिंदू धर्मीयांच्या भाव भावनांचे प्रतीक. महाभारत किंवा त्यातील विविध पात्रे माहीत नाहीत अशी व्यक्ती सापडणे हे अत्यंत दुर्मिळ. मानवी जिवनातील भावभावनांचे प्रतिबींब आपणास यात पहायला मिळते. माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरणारे काम,क्रोध,लोभ,मोह,मद, मत्सर हे षड्रिपू जर कुठे एकत्रीत पहायचे असतील तर तुम्ही फक्त महाभारत अभ्यासा तुम्हाला ते पावलोपावली दिसून येतील. हा झाला यातील एक नकारात्मक भाग तर जिवन कसे जगावे याचे तत्त्वज्ञान हे सुध्दा आपणास महाभारत शिकवते. भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर त्यांच्या प्रिय अर्जुनास जी भगवत गीता सांगितली ती एक अलौकिक असा ज्ञानकोश आहे. जी पुढे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्र्वरी रुपात सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत समजावून सांगितली.

अशा या व्यासमुनी यांच्या खंडकाव्याचे अध्ययन करताना मनात काही प्रश्न निर्माण होतात ज्याची उत्तरे मिळत नाहीत. महाभारतातील स्त्री पात्रांचा अभ्यास करत असताना बहूतांशी त्यांच्यावर अन्याय झाला असे वाटते व महाभारतात शेवटी जे महायुद्ध होऊन अनेक राजे, राजपुत्र,शुरवीर सेनापती व लक्षावधी  सैन्य यांचा वध झाला त्या सर्वांस शेवटी स्त्रीलाच जबाबदार धरले गेले. यातून पौराणिक काळापासून असलेली पुरुष सत्ताक पध्दती व एकंदरच समाजात स्त्रीचे नगण्य स्थान व तीला तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती दिसून येते. महाभारता मधील स्त्री पात्रांचा विचार करता प्रामुख्याने खालील स्त्री पात्रांचा विचार करणे आवश्यक वाटते.
सत्यवती, अंबा, अबीका, अंबालीका, कुंती माद्री, गांधारी, द्रौपदी व ऊत्तरा.

सत्यवती
महाभारताचा विचार करता त्याची सुरुवात कोठून करावी असा एक प्रश्न निर्माण होतो. पण सर्वसाधारणपणे राजा शंतनु व सत्यवती यांचे पासून. सत्यवतीचे मुळ नाव मत्स्यगंधा. मत्स्यगंधा हिचे जन्माचे बाबतीत पुराणांमध्ये असे सांगितले आहे की ब्रह्मदेवाने शाप दिला व आद्रीका नामक अप्सरेला माशाचा जन्म मिळाला वसुद्वारा स्थापीत स्त्री गर्भ त्या माशाच्या पोटात होता. एका कोळ्यास तो मासा मिळाला. त्याने तो मासा कापल्यावर त्याचे पोटातून जी बालीका मिळाली तिच्या सर्वांगास माशाचा वास येत असल्याने तिला मत्स्यगंधा असे नाव मिळाले. पुढे ती वयात आल्यावर एकदा पराशर मुनी तिचेवर भाळले व त्यांचे तपसामर्थ्याने त्यांनी माशाच्या वासाची दुर्गंधी दूर केली व तिला अदभुत अशा सुगंधाचे वरदान दिले. त्यामुळे तिचे नाव योजनगंधा असे झाले. तिला सत्यवती म्हणूनही ओळखले जाते.पराशर मुनींनी तिचेशी संबंधाची ईच्छा व्यक्त केली त्यावेळी तिने ती अविवाहित असलेने असमर्थता व्यक्त केली. त्यावर त्यांनी प्रसुतीनंतर सुध्दा तु कुमारी रहाशील असे सांगितले. त्यांनी आपल्या तपोबळावर आसपास धुके निर्माण कले ज्या योगे त्यांचा प्रणय कोणी पाहणे शक्य होणार नाही अशी व्यवस्था केली. पुढे मत्स्यगंधेने एका दिव्य बालकाला जन्म दिला जे जन्मताच मोठे झाले व वेदमहर्षी व्यास म्हणून प्रसिध्द झाले. पुढे एकदा राजा शंतनु शिकारीसाठी जंगलात आले असता ते सत्यवतीवर मोहीत होऊन लग्न करणेची ईच्छा व्यक्त केली. त्यावर सत्यवतीचे पालक वडिलांनी सत्यवतीचे पोटी होणारी संतान ही हस्तीनापूरची सम्राट होणार असेल तर लग्नास संमती मिळेल असे सांगितले. पण शंतनूस गंगापुत्र देवव्रत ऊर्फ भिष्म हा पहिला पुत्र व राज्याचा ऊत्तराधिकारी होता त्यामुळे शंतनू निराष झाला. पण पित्यासाठी भिष्म यांने विवाह न करण्याची प्रतिज्ञा केली व सत्यवती व शंतनू यांचा विवाह झाला. महायोध्दा भिष्म यांनी विवाह न केल्याने व राजपदावर अधिकार सोडून दिल्याने  पुढे अनेक समस्या निर्माण होऊन महाभारत घडले. यामधे भिष्माने विवाह न करण्यामागे सत्यवतीची राजकीय महत्वाकांक्षा आड आली व स्वताचे मुलासच राजपद मिळावे म्हणून तिने सर्वगुण संपन्न भिष्म यांचा अधिकार हिराऊन घेतला असा तिला दोष दिला जातो. तसेच विवाह होणेपुर्वीच पराशर मुनींपासून पुत्र जन्माला घातला त्यामुळे तिचे चारित्र्यावर प्रश्र्न ऊभे केले जातात. वास्तविक पराशर मुनींना जर नकार दिला तर त्यांचे तपसामर्थ्याने शाप मिळण्याची भिती होती हे कोणीच विचारात घेत नाही. तसेच आपल्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलांची मातेस काळजी वाटणे हे नैसर्गिक आहे म्हणून तिची आपल्या मुलाला राजपदाची मागणी समर्थनीय ठरु शकते. पण याला स्त्रीमत्सर असे रुप दिले जाते. व शेवटी महाभारत युध्द होण्यासाठी अनेक व्यक्ती पैकी तिला एक महत्त्वाची व्यक्ती मानले जाते.

अंबा, अंबीका व अंबालीका
सत्यवतीला चित्रांगद व विचित्रविर्य असे दोन पुत्र झाले. चित्रांगद गंधर्वाबरोबर युध्दात मारला गेल्यावर भिष्म विचित्रवीर्य यास हस्तीनापुरच्या गादीवर बसवतो. काशीराजाच्या तिन कन्या अंबा,अंबीका, व अंबालीका यांचे स्वयंरातून भिष्म सर्वांचा पराभव करून तिन्ही कन्यांचे विचित्रविर्य बरोबर लग्न करून देण्यासाठी पळवून आणतो. पण अंबाने भिष्म यास मी तनमनधनाने राजा शाल्व यास वरले असल्याने अन्य कुणाशी विवाह करु शकत नाही असे सांगितले. त्यामुळे भिष्म तिला राज शाल्व याचेकडे पाठवून देतो व अंबीका व अंबालीका याचा विवाह विचित्रवीर्य याचेबरोबर लाऊन देतो. भिष्माने अंबेचे हरण करुन पळवून नेले असल्याने शाल्व अंबेचा स्विकार करत नाही व ती परत भिष्माकडे येऊन त्याला तिच्या बरोबर विवाह करणेची विनंती करते. पण लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतली असल्याने भिष्म तिचे बरोबर लग्न करण्यास असमर्थता व्यक्त करतो. व पुढे अंबेला आपले जिवन संपवणे भाग पडते. आता यात काही दोष नसताना अंबेचे जिवन उध्वस्त होते पण यात भिष्माला दोशी धरले जात नाही. विचित्रवीर्यच्या अकाली मृत्यूमुळे वंश वृध्दी साठी सत्यवती व्यासमुनींना बोलावून नियोग द्वारे संतान प्राप्तीसाठी अंबिका  व अंबालीका यांना बाध्य केले जाते. येथे त्यांच्या ईच्छा आकांक्षा यांना काहीच महत्त्व नाही. कुरुवंशाला वारस देणे एवढेच त्यांचे कार्य. त्यांचेवर अन्याय झाला असे कुणाला वाटत सुध्दा नाही.
कुंती
यादव कुळातील शुरसेन याची कन्या काशीराज याला दत्तक दिल्यावर तिचे कुंती असे नामकरण झाले. हस्तिनापूरचा राजा पंडू यांचेशी विवाह होवून ती हस्तीनापुरची राणी बनते. कुंती चे सर्व आयुष्य म्हणजे एक शोकांतिका आहे. लग्नापुर्वी दुर्वास मुनींनी दिलेल्या मंत्रशक्तीने ती कोणत्याही देवतेचे स्मरण करून पुत्ररत्न प्राप्त करु शकेल असे वरदान लाभते. कुमारी असताना ऊत्सुकतेपोटी सुर्य देवाचे स्मरण करून ती मंत्र म्हणते व कर्ण यांचा जन्म होतो पण ती कुमारी असल्याने ती मुलाला जवळ ठेऊ शकत नाही व त्यामुळे त्या बालकाला एका पेटीत ठेवून पाण्यात सोडून देते. एका सारथ्यास ती पेटी मिळते व तो त्यातील बालकाचे पालन करतो. राजा पंडुच्या हातून एका ऋषी पती-पत्नी यांना शिकारीचे वेळी बाण लागला असतो त्यामुळे त्याला मिळालेल्या शापामुळे तो आपल्या दोन्ही पत्नीशी प्रणय करु शकणार नसतो. त्यामुळे तो राज्य ध‌तराष्ट्र या बंधूकडे सोपवून जंगलात निघून जातो. जंगलात गेल्यानंतर कुंती राजा पंडू यास तिला असलेल्या वरदानाची माहिती देऊन त्याद्वारे आपणास पुत्ररत्न होईल असे सांगते. व त्याप्रमाणे मंत्रशक्तीने धर्म, भीम व अर्जून यांचा जन्म होतो. कुंती आपली सवत माद्री हिला सुध्दा मंत्र शक्ती देते ज्या योगे ती नकूल व सहदेव यांना जन्म देते. पण राजा पंडूस स्त्री मोह आवरत नाही व माद्रीसोबत प्रणय करताच त्याचा मृत्यू होतो. कुंती पाची मुलांना घेऊन पुन्हा हस्तीनापूरला परत येते. येथे राजप्रासादात सुध्दा तिच्या वाट्याला हाल अपेष्टाच येतात. एक तर वैधव्य जीवन व पाच मुलांबरोबर तिला ही त्रास होतो. पुढे पांडवांचे बरोबर वनवासात जिणे तिच्या नशिबी येते. स्वताचा प्रथम पुत्र समोर येऊन सुध्दा ती त्याला समाजासमोर पुत्र म्हणून प्रेम देऊ शकत नाही. शेवटी युध्दात आपल्याच दोन वीरपुत्रात युद्ध होत असताना हतबलपणे पहाण्याशिवाय तिला काही पर्याय उपलब्ध नसल्याने एका मुलाचे हातून दुसऱ्याचा मृत्यू पहाण्यासारखी दुर्दैवी घटना तिच्या नशिबी येते. एकूणच तिचै आयुष्य हे सुखापेक्षा दुःखद घटनांनीच जास्त भरलेले होते असेच दिसून येते.

माद्री
मद्र देशाची राजकन्या व हस्तीनापूरचा राजा पंडू याची द्वितीय पत्नी, नकूल सहदेव यांची माता एवढीच तिची ओळख. संपूर्ण महाभारतात याशिवाय तिला फारसे महत्त्व दिल्याचे आढळून येत नाही. कुंती व पाडूपुत्र याचेवरील अन्याय यामधे तिने तिचे आयुष्य कसे जगले असेल याची साधी चर्चाही कोणी फारशी करत नाही. तर तिच्यावर अन्याय झालाय असे वाटण्याचा प्रश्नच नाही. एकूणच तिचे महाभारतातील स्थान काय हाच प्रश्न मनात येतो.

गांधारी
गांधार सारख्या एका संपन्न देशाची राजकन्या आणी हस्तीनापूरचा सम्राट धृतराष्ट्र याची पत्नी. तिच्या इतकी दुर्दैवी स्त्री संपूर्ण महाभारतच काय अन्य कोणत्याही पौराणिक काव्य अथवा इतिहासात सापडतणार नाही. निव्वळ एक राजकीय सोय व राजकारणासाठी तिचा धृतराष्ट्र सारख्या अंध व्यक्ती बरोबर विवाह लावून दिला जातो. तिच्या त्यागाची महती लोकांना पटवून देणे साठी तिला संपूर्ण आयुष्य दृष्टी असून सुध्दा डोळ्यांवर पट्टी बांधून एका अंध व्यक्ती प्रमाणे आयुष्य कंठावे लागले. नुसते तिच्या त्यागाचे गोडवे गाऊन तिच्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन होईल काय? एखाद्या दृष्टी असलेल्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य हे डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळ्या सारखं जगणं हे किती कष्टप्रद असू शकते हे ज्याच्या वाट्याला असे जगणे येईल तीच व्यक्ती जाणू शकते. इतिहासात तरी असे दुसरे उदाहरण सापडणार नाही. पोटी शंभर पुत्र व त्या सर्वांचे महायुध्दात निधन व शेवटी निपुत्रिक म्हणून मृत्यू यापेक्षा अजून दुर्दैव ते काय असू शकते. कुंतीला फक्त एक पुत्र युध्दात गमवावा लागला होता हे येथे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. येथे कौरव वाईट व पांडव हे चांगले हा विषय नाही तर एका स्त्रीचे द्रृष्टीने आपल्या मुलांचा मृत्यू ही गोष्टी विचारात घेतली आहे. म्हणूनच महाभारतातील अन्याय झालेले पण ज्यांची फारशी दखल न घेतलेल पात्र असेच तिचे वर्णन करावे लागेल.

द्रौपदी
महाभारतातील एक सर्वात महत्त्वाचे व संपूर्ण महाभारत ज्या एका पात्रा भोवती फिरत रहाते किंवा जिच्या मुळेच महाभारत घडले असे सर्रास लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सुशिक्षित, अशिक्षित व ज्याने कधीच महाभारत वाचले नसेल अशा सर्व प्रकारच्या लोकांकडून म्हणले जाते असे एक प्रमुख पात्र. आपण कल्पना करा की जर महाभारतातील द्रौपदी हे पात्रच काढून टाकले तर महाभारतात काय शिल्लक राहील. द्रौपदीच्या आयुष्यात घडलेल्या अनेक अलौकिक घटनांप्रमाणेच तिचा जन्म सुध्दा अशीच अलौकीक घटना आहे. यज्ञातून ती ऊत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी या नावे सुध्दा आळखले जाते. पांचाल नरेश द्रुपद याची कन्या म्हणून तिला पांचाली तसेच राजा द्रुपद याची कन्या म्हणून द्रौपदी या नावाने सुध्दा संबोधले जाते. पांचाल नरेश द्रुपद याने यज्ञातून तिला जन्म दिला तोच मुळी कुरु कुळाचा नाश करणे या एकमेव उद्देशाने. गुरू द्रोण यांचे शिष्यांनी राजा द्रुपद यांचा पराभव करून पांचाल देशाचे दोन तुकडे केले याची सल त्याच्या मनात असलेने कुरुंचा विनाश या एकमेव उद्देशाने द्रौपदीची निर्मीती. म्हणजे तिचा जन्मच एका वाईट उद्देशाने झाला. आता कोणत्याही निर्मीतीचा उद्देशच मुळात वाईट असेल तर निर्माण झालेली वस्तू सुध्दा वाईट ठणारच. व त्यामुळेच पुढे द्रौपदीचे आयुष्यात अनेक दुर्दैवी घडत गेल्या हेच तर रचनाकारांना यातून सुचीत करायचे होते किंवा काय ? अजून एक अतर्क्य म्हणजे द्रौपदीस बालपण नाही. ती उपजताच पुर्ण वाढ झालेली तरुण मुलीचे रुपात जन्मास आली. या अतार्कीक घटनेचा संबंध ती एकाच वेळी पाच पुरुषांची पत्नी झाली या दुसऱ्या अतार्कीक घटनेशी आपण लाऊ शकतो. अन्यथा एका वेळी पाच पुरुषांची पत्नी हे बुध्दीला न पटणारे आहे. अर्जुनाने तिला स्वयंवरात जिंकून आणल्या नंतर माता कुंतीच्या आज्ञे प्रमाणे तिला पाच पाडवांशी विवाह करावा लागतो. भले ती आज्ञा कुंतीने गैरसमजुतीने दिली असली तरी त्याच्या ज्या काही वेदना असतील त्या  तरी या द्रौपदीलाच भोगाव्या लागल्या ही वस्तुस्थिती आहे. येथे रचनाकार एका स्त्रीवर तर अन्याय करतातच पण त्या अन्यायाचे कारण सुध्दा दुसरी स्त्रीच कशी राहील याची काळजी घेताना दिसतात. व कदाचीत यातूनच एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची वैरी असते अशी म्हण प्रचलित झाली असावी. आता एका वेळी पाच पुरुषांची पत्नी असणं हे कोणाही स्त्रीला किती अपमानास्पद असू शकते याचा येथे कोणी विचारच करत नाही.
आता अजून एक घटना म्हणजे युधीष्ठीर व द्रौपदी एकांतात असताना चुकीने अर्जुनाने तेथे प्रवेश करणे व त्यांचे प्रायश्र्चीत्त म्हणून त्याला त्रिदंडी संन्यास घ्यावा लागणे. कोणीही पती-पत्नी एकांतात असताना तेथे अन्य पुरुषाचे अचानक येणे ही स्त्रीसाठी किती लज्जास्पद बाब आहे हे तीच जाणू शकते. पुन्हा अर्जुनाने संन्यास घेणे ही शिक्षा सुध्दा द्रौपदीने ठरवलेल्या नियमानुसार होते. येथेही नकळत बोट द्रौपदीकडे दाखवले आहे.
आता महाभारतातील सर्वात महत्त्वाचा व ज्या मुळे पुढे महायुद्ध घडले तो वस्त्रहरणाचा प्रसंग. द्यूतगृहामधे सर्व काही हरल्यानंतर युधिष्ठिर त्याच्यावतीने द्रौपदीस तेथे पणास लावतो. यातून काय सुचीत होते युधिष्ठिराने सोने,नाणे, जडजवाहीर, स्वत:चे राज्य याचे बरोबर द्रौपदीस पण एक निर्जीव वस्तू समजले काय. आणी पुढचा प्रश्न एखाद्या पुरुषाला इतका अधिकार असतो का की तो आपल्या पत्नीला द्युतामधे पणाला लावू शकेल. युधिष्ठिर तीही खेळी हरतो व नंतर रजस्वला अवस्थेतील द्रौपदीला अपमानास्पद अवस्थेत सभेमध्ये आणले जाते. दुष्यासन तिला भर सभेमधे निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न करतो. श्रीकृष्ण कृपेने तिचे लज्जारक्षण होते. मला एका प्रश्र्नाने कायम अचंबित केले की तेथे एकापेक्षा एक धुरंधर उपस्थित असताना कोणीही साधा विरोध केला नाही. त्यावेळची समाजव्यवस्था इतक्या वाईट स्तराला गेली होती काय की भर सभेत हा प्रसंग घडत असताना कोणीही प्राण पणाला लावून विरोध केला नाही. स्त्रीला एवढीही किंमत नव्हती की तिच्या साठी कोणीतरी जीव धोक्यात घालावा. का जे घडतंय त्यात काही चुकीचे आहे असं कुणाला वाटल नाही की दरबारात असलेले पद प्रतिष्ठा यापुढे स्त्रीची विटंबना ही कुणाला फारशी महत्त्वाची वाटली नाही. पुढे यातूनच विनाशकारी असे महायुद्ध घडले व ज्यात मोठा नरसंहार होऊन लाखो स्त्रियांना वैधव्य आले व त्या सर्वांस कारणीभूत द्रौपदीसच धरले गेले.
मी अशा अगदी मोजक्या स्त्री व्यक्तीरेखांचा येथे विचार केलाय. संपूर्ण महाभारतात या वितीरिक्त अभिमन्यू पत्नी ऊत्तरा, कर्णपत्नी वृशाली अशा कित्येक व्यक्तीरेखा असतील ज्याचा कधी कुठे फारसा उल्लेखही कोणी  केला नसेल तर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा काय विचार होणार. पण कोठेतरी त्यावेळची समाज व्यवस्था व एकूणच स्त्रीयांकडे पहायचा द्रृष्टीकोन याबाबत मनात प्रश्र्नचिन्ह निर्माण करतो एवढे निश्चित.

सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा.
३१ जुलै २०१८

टीप:- हा लेख हा महाभारतकालीन समाज व्यवस्था व त्यावेळची स्त्रियांकडे पहाण्याची मानसीकता या दृष्टीकोनातून लिहीला आहे. कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही.

Friday, 29 March 2019

वृध्दपण कसे आनंदी करावे

वृध्दपण कसे आनंदी करावे

मानवी जिवनाचे साधारण चार टप्पे मानले जातात. बालपण, तारुण्य, प्रौढत्व व वार्धक्य. यामधे सर्वसामान्यपणे प्रौढत्वा पासूनचा काळ वयाच्या पन्नाशी नंतर समजला जातो तो साधारण वयाच्या सत्तरी पर्यंत व त्यानंतर वृध्धापकाळ समजला जातो. ह्याच काळातील व्यक्ती ही जेष्ठ नागरिक म्हणून संबोधली जाते. यातील ५० ते ६० वर्षे या काळात व्यक्ती बऱ्यापैकी कामकाज नोकरी व्यवसाय करत असते त्यामुळे ६० व्या वर्षी निवृत्त झालेल्या व्यक्तीस समाजामध्ये जेष्ठ नागरिक असे म्हटले जाते.

पुर्वीच्या काळाच्या तुलनेत आता वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने आयुर्मान वाढले आहे. व संपूर्ण जगात दिवसेंदिवस जेष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. नवीन पिढीला मार्गदर्शक म्हणून जेष्ठ नागरिक हे समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहेत व ते नवीन पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात. त्याचबरोबर अशा जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही समाज व शासन अशी दोघांची जबाबदारी आहे. या साठी सुदृढ आणि निरोगी कुटूंब व्यवस्था असावी लागते. पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती व घरातील जेष्ठांची काळजी ही कुटुंबातील तरुण पिढी घेत होती. पण दिवसेंदिवस ही परिस्थिती आता बदलत आहे व विभक्त कुटुंबपद्धती ही वस्तुस्थिती बनली आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांच्या नवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत. मुलगा नोकरी निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये स्थाईक झाला आहे तर आई वडील त्यांच्या घरी अशी ऊदाहरणे सर्वत्र पहायला मिळतात. आपल्या देशात सरकारी पातळीवर शासन जेष्ठ नागरिकांच्या साठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. पण एकंदरीत आर्थीक परिस्थिती विचारात घेता त्यास मर्यादा येतात. त्यामुळे आपला वृध्दापकाळ आनंदाने घालविण्यासाठी प्रत्त्येक जेष्ठ नागरिकांनी काही बाबतीत स्वताच काळजी घेणे आवश्यक आहे.

आता यातील पहिला महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक शिस्त होय. आपण निवृत्त होण्यापूर्वी नोकरी व्यवसाय करत असतानाच आपली निवृत्ती नंतरची आर्थीक सोय करुन ठेवणे. त्यामुळे निवृत्ती नंतर पेन्शन नसल्यास कोणावरही अवलंबून रहावे लागणार नाही. निवृत्तीनंतर मिळालेला पैसा जास्त व्याजाचे लोभापायी असुरक्षित ठिकाणी कधी गुंतवणूक न करणे. त्यामुळे व्याज थोडेसे कमी मिळेल पण मुदलात घाटा येणार नाही व आपले दैनंदीन जीवन सुरळीत चालू राहील. यानंतर तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शारीरिक स्वास्थ्य. त्यासाठी नियमीत व्यायाम, योगासने व वेळच्यावेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व जी औषधे सांगीतली असतील ती न चुकता घ्यावी म्हणजे स्वत:ला व आपल्या मुळे  अन्य कोणालाही त्रास होणार नाही. अशा प्रकारे स्वताची स्वत: काळजी घेतल्यास आपले शरीर स्वास्थ्य उत्तम राहील. यानंतर तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कौटुंबिक संबंध. आपल्या मुलाचे लग्न झाले असेल तर त्याच्या संसारात फार ढवळाढवळ न करणे. एखाद्या बाबतीत सल्ला विचारला तर जरूर द्यावा पण कायम लुडबुड करु नये. शरीरप्रकृती ऊत्तम असेल तर घरातील छोटी मोठी कामे जरुर करावीत त्यामुळे शारिरीक हालचाल होऊन व्यायाम होईल मुलगा व सून यांना घरातील कामास हातभार लागेल. त्यामुळे आपोआपच घरातील वातावरण खेळकर व आनंदी राहील. आपणास जर सामाजिक कामाची आवड असेल तर अशा संस्थाशी संपर्क ठेवून शक्य तेवढी मदत करावी. संगीत किंवा नाटक यांची आवड असेल तर अशा कार्यक्रमांस आवर्जून उपस्थित रहावे. त्यामुळे आपले तन व मन प्रफुल्लित राहील.
आपला वृध्दापकाळ किती आहे हे कोणीही सांगू शकत नाही, पण परमेश्वराने जे आयुष्य आपणास दिले आहे ते आनंदात जाईल याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.  प्रत्येकाने जर स्वत:ची स्वत: वरीलप्रमाणे काळजी घेतली तर आपला वृध्दापकाळ तो आनंदात व सुखासमाधानाने घालवू शकेल.

सुरेश काळे
सातारा
९८६०३०७७५२

Wednesday, 27 March 2019

तो आती ती

तो आणी ती

आयुष्यात काही वेळा असे का असा आपल्याला प्रश्न पडतो पण त्याचे ऊत्तर कुणालाच ठाऊक नसते. तो आणी ती एक छान जोडी. तिला वगळून त्याचा किंवा त्याला वगळून तिचा आपण विचार सुध्दा करू शकत नाही इतके ते एकमेकांशी एकरुप झालेले असतात. तथापि आपण जर दोन्हीही व्यक्तींचा स्वतंत्रपणे अभ्यास केला तर आपल्याला आश्र्चर्य वाटल्या शिवाय रहात नाही. तो बराचसा अबोल तर तीचीअखंड बडबड चालू असते. तिला नाविन्याची हौस तर तो परंपरागत विचारसरणी असलेला. ती ऊत्तम खेळाडू तर तो फक्त एक प्रेक्षक. तिला घरगुती संसारीक दुरदर्शन मालिका बघायला आवडतात तर तो फक्त क्रिकेटची म्याच पहात बसणार.तिला घर निटनेटके ठेवायला आवडते तर तो जागोजागी पसारा करुन ठेवणार. अशा एक ना अनंत विसंगत बाजू आपल्याला पहायला मिळतात. मग प्रश्न असा पडतो कि दोघांच्या विचारसरणीत ईतकी भिन्नता असताना दोघांना एकत्रित पहाताना कोणालाच कसे विसंगत आढळून येत नाही व तो व ती एक आदर्श जोडी का वाटते. आता याचे ऊत्तर शोधत असताना असे आढळते की त्यांच्यात कितीही फरक असला तरी त्यांचे एकमेकांशी असलेले प्रेमाचे नाते व एकमेकांवर असलेला अतूट विश्र्वास.कारण संसार हाच मुळी एकमेकावरील प्रेम व विषश्र्वासावर अवलंबून असतो व एकमेकाप्रती आदरभाव व समर्पण  हिच खरी यशस्वी संसाराची गुरुकिल्ली आहे.तिला माहित आहे. की त्याला क्रिकेटची आवड आहे पण ती मुद्दाम त्याला डिवचण्यासाठी संसारी मालिका लावते. त्यालाही हे चिडवणे मनातून आवडत असते पण वरवर तो चिडल्याचा आव आणतो पण अधूनमधून चानेल बदलून तो तिच्यासह त्या घरगुती मालीकेचा आनंद घेत असतो. तीसुध्दा अधुन मधून त्याला साथ देत असते. संसारीक जिवन हे असेच असते. दोघांची विचारसरणी, आवड जरी वेगवेगळी असली तरीही एकमेकासाठी आपल्या आवडीला दोघांनी थोडीशी मुरड घातली व आपल्या सहचाऱ्याचा त्याच्या आवडी निवडीचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचा संसार आनंदाने फुलून जातो. ऊलट प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले तर जागोजागी आपणास एकतर विभक्त झालेली किंवा ओढूनताणून संसार चालवणारी जोडपी पहावयास मिळतील. यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करणे आवश्यक आहे तसे झाल्यास जगात सर्वत्र सुखी व आनंदी कुटुंब दिसून येतील व भारतीय संस्कृती बद्दल आपण सार्थ अभिमानाने आपल्या संस्कृतीचे महत्व जगाला पटवून देवुन आपला देश, धर्म संस्कृती याचे रक्षण करुन जगासमोर आदर्श निर्माण करण्यात यशस्वी होऊ.

सुरेश काळे
सातारा
मो.९८६०३०७७५२

Monday, 25 March 2019

प्रणय जेष्ठांचा

प्रणय जेष्ठांचा

लेखाचे शिर्षक वाचून थोडे चक्रावलात ना ? हे असेच होते. मुळात आपल्या समाजात प्रणय या विषयावर बोलणेच जिथे अनैतीक समजले जाते तिथे जेष्ठ व्यक्तींच्या प्रणयाची चर्चा करणे हे महापापच समजले जाईल. मुळात जेष्ठ व्यक्ती प्रणय करतात किंवा त्यांना एकमेकांचा सहवास आवडतो व ती एक मानवी शरिराची नैसर्गिक गरज आहे हेच मुळी आपल्याकडे मान्य केले जात नाही. त्याबाबत नुकताच आलेला अनुभव.
मी व माझी पत्नी आमच्या नातीला घेऊन बागेत गेलो होतो. बंगलोर सारखे मोठे शहर जेथे भारतातील वेगवेगळ्या भागातील मुले मुली नोकरी निमित्ताने रहात असतात. त्यांचे पालक अधून मधून येत असतात. माझी पत्नी नातीला जवळच घसरगुंडीवर खेळवत होती व मी बाजूला एका बाकावर बसलो होतो. मला माझ्या पाठीमागे मराठीमध्ये दोन बायका बोलत असल्याचे जाणवले तर पाठीमागील बाकावर माझ्यासारख्याच दोन मराठी भाषीक  जेष्ठ बायका बोलत होत्या. आता बंगलोर हे एक पर्यटन स्थळ असल्याने तेथे भारतीय लोकां प्रमाणे परदेशातील पर्यटक सुध्दा येत असतात. तेवढ्यात त्या दोन बायकांच्या समोरून एक युरोपियन जेष्ठ कपल गेले. दोघेही मस्तीत एकमेकांचा हातात हात घेत चालले होते. त्या युरोपियन स्त्रिने तिच्या जोडिदाराच्या कानात काही तरी सांगितले तर त्यावर त्याने हसून तिच्या गालाचे चुंबन घेतले व ती दोघे हसत हसत हातात हात घालून पुढे गेले. ते पाहून एक बाई दुसरीला “ बाई बाई बाई काय मेलं वागणं, बघीतलस ना, ना जनाची ना मनाची लाज. आपल वय काय? आपण करतोय काय काही म्हणजे काही धरबंध नाही.” दुसरी बाई “ नाही तर काय, मला तर बघूनच अगदी शरमल्या सारखं झालंय. आपल्याला बघायला नको वाटतय ते मस्त हातात हात घालून फिरतायत.
आता त्या दोघी मराठी भाषीक बाजूला बरेचसे कानडी भाषीक त्यामुळे त्या अगदी बिनधास्त बोलत होत्या व मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होतो. व त्यांचे बोलणे मला विचीत्र वाटत होते. आपले वय झाले साठी ऊलटली म्हणजे आपल्याला आपल्या पत्नीवर प्रेम करण्याचा अधिकार सुध्दा नाही. आपण तिचा हात हातात घेऊ शकत नाही प्रेमाने तिच्याशी मन मोकळे बोलू शकत नाही. तिला प्रेमाने जवळ घेऊ शकत नाही. हे सगळच जरा विचीत्र होते व माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे होते. आता पुर्वीची परिस्थिती राहिलेली नाही. चांगल्या वैद्यकीय सुविधा असल्याने माणसांचे आयुर्मान वाढले आहे. ऊत्तम वैद्यकीय सुविधा तसेच चांगले खाणेपिणे यामुळे निवृत्तीचे वेळी तब्येत ठीक असते. त्यामुळे उतारवयात सुध्दा जेष्ठ नागरिक चांगले हिंडू फिरु शकतात. ऊत्तम आरोग्य, स्वताचे स्वतंत्र घर यामुळे ते शांतपणे जिवन जगू शकतात. पण त्यांच्या शारीरिक गरजांचे काय त्याबद्दल तर बोलणही पाप समजले जाते. वास्तविक याच वयात ते बऱ्याचशा घरगुती जबाबदारीतून मुक्त झालेले असतात व जास्त मोकळेपणाने ते प्रणयाचा आनंद घेऊ शकतात. पण आपल्या देशात जिथे सेक्स हा शब्द उच्चारणे देखील वाईट समजले जाते तिथे ज्येष्ठांना सुध्दा कामेच्छा असू शकते याचा कोणी विचार सुध्दा करणार नाही. ज्येष्ठांना सुध्दा एकांताची गरज असते त्यांना सुध्दा कामेच्छा असू शकते याचा विचार सुध्दा कुणी करत नाही. वास्तविक सेक्स व खोडकरपणा खट्याळपणा या गोष्टी आयुष्यात खूप गरजेच्या आहेत. त्यामुळे उतारवयातील आयुष्य हे आनंददायी होते. पण आपल्याकडे यांचा जेष्ठांचे बाबतीत विचार करणं सुध्दा पाप समजले जाते.
वास्तविक जर तुमची तब्येत ठणठणीत असेल, तुमचं खाणं पिणं व्यवस्थीत असेल व जर तुम्ही चांगले ऍक्टीव्ह असाल तर सेक्स मध्ये सुध्दा  ऍक्टीव्ह राहू शकता. भले तरुण वयातील जोश नसेल पण तुम्ही त्याचा आनंद नीश्र्चीतच घेऊ शकता. आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या शास्त्रीय संशोधनात आढळून  आले की जेवढे तुम्ही सेक्स मध्ये ऍक्टीव्ह असाल तेवढे तुमचे शरीर स्वास्थ्यही ऊत्तम रहाते. तुमच्या शरीरात जे हार्मोन्स निर्माण होतात त्याने तुमचे बी.पी. नॉर्मल रहात असते. तुम्ही तुमच्या वयाच्या प्रमाणात जर सेक्स मध्ये ऍक्टीव्ह असाल तर  हृदयस्वास्थ्य हे सुध्दा चांगले रहाते. पण आपल्याकडे जेष्ठ व्यक्तींचे असे ऍक्टीव्ह असणे  सुध्दा चर्चेचा व कुचेष्टेचा विषय होतो.
खरे पहाता उतारवयातील सेक्स अथवा प्रणय नुसता शारीरिक नव्हे तर तो तुम्हाला मानसीक दृष्टीने सुध्दा उपयुक्त आहे. त्यामुळे तुमचे मानसीक आरोग्य चांगले राहते. पती पत्नी दोघेही त्यांचे आयुष्य अधिक आनंददायी घालवून आनंद मिळवू शकतात. अर्थात यासाठी सुध्दा मुले समंजस असायला हवीत व त्यांनी  आपल्या आई वडिलांना सुध्दा एकांताची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जिवनाच्या ऊत्तरार्धात जितके तुम्ही आनंददायक पध्दतीने रहाल तितक्या व्याधी तुमच्या पासून दूर पळतात. तेव्हा सर्व ज्येष्ठांनो मस्त आनंदाने रहा व आपले  जिवन आनंदमय करा.

सुरेश काळे
हो.९८६०३०७७५२
सातारा.

Sunday, 24 March 2019

सुख आणि दुःख

         सुख आणि दुःख

समर्थ सांगून गेलेत जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तुमची शोधून पाहे. तसा विचार करायला गेलो तर कोणीच सुखी मिळणार नाही. कारण प्रत्येकाला काही ना काही तरी दु:ख हे असतेच. सुख हे जसं मानण्यात आहे तसं दु:खही मानण्यात आहे. सुख हे तुमच्या वृत्तीवर अवलंबून आहे. तुम्ही जिवनाकडे कोणत्या दृष्टीने पहाता यावर ते अवलंबून असते. तुम्ही जिवनाकडे जर कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पहात असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुख आढळून येईल. पण जर तुमचा दृष्टीकोनच जर नकारात्मक असेल व त्याच दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे पहात असाल तर तुम्हाला कशातच सुख दिसणार नाही. व तुम्ही निराश व दु:खी व्हाल.
सुखी होण्यासाठी फार काही लागत नाही फक्त तुमचा जिवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. तो सकारात्मक असेल तर तुम्ही सुखी असाल. पण दु:खाचे तसे नाही. त्यासाठी भरपूर कारणे आढळून येतील. आसुया, मत्सर, निराशा ही काही महत्त्वाची कारणं सांगता येतील. पण त्याचबरोबर किंवा त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे तुलना व मी येथे फक्त त्याच कारणाचा विचार केला आहे. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आपण जर तुलना करून पहात बसलो तर कायम दु:खच वाट्याला येण्याची शक्यता असते. तुलना करताना आपण सारासार विवेकबुद्धी बाजूला ठेवून भावनिक होऊन विचार करतो. अशावेळी केलेला विचार काही वेळा अविचार ठरु शकतो.
मी नोकरी करीत होतो. माझे काम मी प्रामाणिकपणे करत होतो. पण एका ठरावीक स्टेजवर मी थांबलो पुढे मला पदोन्नती मिळाली नाही. व माझ्या नंतर आलेले माझ्या पुढे निघून गेले. अशा वेळी विचार करताना मी विचार केला की माझ्या पेक्षा त्या व्यक्तीकडे काही तरी गुण जास्त असतील व त्यामुळे ती व्यक्ती जास्त यशस्वी झाली. त्याऐवजी मी जर माझ्यावर अन्याय झालेला आहे असा विचार केला असता तर मी दु:खी झालो असतो. पण मी दुसरी व्यक्ती माझ्यापेक्षा थोडी अधिक चांगली असेल असा सकारात्मक विचार केल्याने मला  खुप वाईट वाटले नाही. मानवी स्वभावानुसार थोडावेळ वाईट वाटले जे स्वाभावीक होते. पण विचार सकारात्मक ठेवल्याने अतीव दुःख वा निराश होऊन त्यातच भरकटून गेलो नाही.
आपल्या कडे एक म्हण आहे “शेजारणीने घेतली सरी म्हणून गळ्यात बांधली दोरी” व ही म्हण बऱ्याच वेळा महीलांना लागू होते. प्रत्येक गोष्टीत शेजारच्या महीलेशी बरोबरी करायला जातं हे बहूधा दुःखाला कारणीभूत ठरते. माझ्या ओळखीच्या कुटूंबातील एका मुलीचे लग्न होते. तिला मस्त महिना दोन लाख पगारवाला नवरा मिळतो. स्वत:च्या मोठ्या फर्नीश्ड फ्लॅट मध्ये ती रहात असते. नंतर तिच्या एका मैत्रिणीचे लग्न होते. तुलनेत तिच्या नवऱ्याला पगार कमी असतो. पण तिला आपल्या मैत्रीणीप्रमाणे पॉश फ्लॅट मध्ये रहायला मिळावे अशी तिची अपेक्षा असते. येथे आपणास तुलना दिसून येते. त्यामुळे मैत्रीणीसारखे आपण चांगल्या मोठ्या फ्लॅटमध्ये आपण राहू शकत नाही म्हणून ती दु:खी होते. वास्तविक तिने जर तुलना न करता विवेकबुद्धी वापरुन विचार केला असता व आपल्या पतीच्या ऊत्पन्नाचा विचार करुन अपेक्षा ठेवल्या असत्या तर ती आनंदात राहीली असती.
आता त्या मैत्रीणीने जर तिच्या कलागुणांचा विचार करून व त्याचा वापर केला तर तिही आपले ऊत्पन्न वाढवून चांगले आनंदी जीवन जगू शकते पण त्यासाठी थोडेफार कष्ट केले पाहिजेत व थोडा धीर धरला पाहिजे. सर्व माणसाचं हे असंच असते. जे आपल्याकडे आहे त्याचा विचार न करता माणूस  जे नाही त्याचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवतो व पर्यायाने दु:खी होतो. यासाठी जे नाही त्याचा विचार करून निराश व दु:खी होण्यापेक्षा आपल्याला परमेश्र्वराने जे दिले आहे त्याचा आनंद घेतला तर आपले सर्वांचेच जीवन हे अधिक आनंदमय सुखी होईल.

सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा.
२३ मार्च २०१९

Friday, 22 March 2019

गांधारी

               गांधारी
गांधारी महाभारतातील एक महत्त्वाचे पण दुर्लक्षित पात्र. गंधार देशाची स्वरुपसुंदर राजकन्या दुर्दैवाने एका अंध राजाची पत्नी होते व संपुर्ण जिवन डोळे असूनही निव्वळ पती निष्ठा म्हणून डोळ्यांवर पट्टी बांधून अंध स्वरुपात व्यतीत करते. डोळे असून अंध म्हणून आयुष्य व्यतीत करताना तिला ज्या वेदना सहन कराव्या लागल्या असतील त्यांची तुम्ही आम्ही फक्त कल्पना करु शकतो. एखादी अंध व्यक्तीच तिचं दु:ख तिची वेदना समजू शकते.
जेवढा म्हणून आपण गांधारीचा विचार करायला लागतो तेवढं आपण तिच्या वेदनेच्या अधिक जवळ जातो. एका देशाची राजकन्या म्हणून तिच्या काही भाव भावना असतील. तिच्याही स्वप्नातल्या राजकुमारवर तिचं मन आकृष्ट झाले असेल. तिलाही एखाद्या तेजस्वी राजाची राणी होण्याची आकांक्षा असेलच. मग तिच्या ईच्छा आकांक्षांचे काय झाले, व का असे अंधकारमय जीण तिच्या नशिबी आले. याचा कोणी विचारच करत नाही. संपूर्ण महाभारतात तिला एक महान पतीव्रता असे म्हणून बोळवण केली असेच वाटते.
महाभारत निश्र्चीतच आपले एक महाकाव्य आहे. व त्यामधून भगवान श्रीकृष्णांनी भगवतगीता रुपाने महान तत्वज्ञान मानवास दिले व जिवनाचा महामंत्र दिला आहे हे सत्य आहेच. पण मग गांधारीवर जो अन्याय झाला त्याचा आपण विचार करणार की नाही हा प्रश्र आहे. आजही समाजात अशा अनेक गांधारी आपले जीवन व्यतीत करताना दिसतात. मुळात गांधारीचा धृतराष्ट्रा बरोबर झालेला विवाह हा एक राजकारणाचा भाग होता. हस्तीनापूर सारख्या सम्राटाकडून मागणी घातली गेल्यानंतर त्यास नकार देण्याची हिम्मत गांधार राजाची नव्हती व त्याचबरोबर नाही म्हणले तरी हस्तीनापूर सारख्या मोठ्या राजघराण्याशी जुळणारे नाते आजच्या भाषेत सोयरीक यांचा मोह गांधार नरेशास झालाच नसेल असे नाही. आजही जर एखाद्या मंत्र्याने किंवा आमदारांने जर त्याच्या मुलासाठी एखाद्या वधू पित्याला मागणी घातली तर
तिला झिडकारण्याचे धाडस किती वधू पिता दाखवतील. मंत्री आमदार यांचा सध्या असलेला रुबाब व काही अंशी दरारा त्याला हे धाडस करु देणार नाहीच त्याचबरोबर अशा राजकीयदृष्ट्या फायद्याच्या सोयरीकीचा मोहही त्याला होणारच. मग अशा वेळी त्या मुलीला विचारण्याची तिचा होकार आहे का याची साधी विचारपूस सुध्दा केली जात नाही व ती मुलगी डोळे असून सुद्धा जे काही आपल्या घरच्या लोकांनी ठरवले असेल त्याच्यापुढे मान करुन वरमाला स्विकारते व गांधारी सारखं आपलं आयुष्य व्यतीत करते.
गांधारीने शंभर मुलांना जन्म दिला असं महाभारतात दिसून येते. आता मुळात कोणतीही स्त्री १०० मुलांना जन्म देणं वैज्ञानिक दृष्ट्या शक्य वाटत नाही. तरीही आपण मान्य करु की तिला जी काही दैवी शक्ती तिच्या तपश्चर्येमुळे प्राप्त झाली होती. तो एक दैवी चमत्कार होता पण आता सुध्दा काही सुशिक्षित अपवाद सोडले तर एकापाठोपाठ एक मुलांना जन्म घालणारे महाभाग आपल्याला समाजात दिसून येतात. वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुली पाठोपाठ मुली झाल्या तरी मुलगा हवा म्हणून त्या स्त्रिला बाळंतपणाच्या वेदना देणारे महाभाग अगदी सुशिक्षित समाजातही आढळून येतात. येथे त्या स्त्रिच्या अनुमतीची गरजसुध्दा भासत नाही तर तिला होणाऱ्या त्रासाची कोण चिंता करणार. यामध्ये त्या स्त्रिचा होणारा कोंडमारा कोणालाही दिसत नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही वेळा एखादी स्त्रीच सासूच्या भूमिकेतून आपल्या सुनेला मुलगा होण्यासाठी भावनिक दृष्टीने बोलून अशा वारंवार बाळंतपणाच्या फेऱ्यात अडकले व ती स्त्री मुकाट्याने ते सर्व सोसत रहाते.
गांधारीला शंभर पुत्र झाले पण ते सर्व वाममार्गी होते त्यामुळे युध्दमधे ते सर्व मारले गेले व शेवटी तीला निपुत्रीक म्हणून आपले जिवन व्यतीत करणे क्रमप्राप्त झाले. येथे पुत्रांची संख्या किती हे महत्त्वाचे नाही तर सद्वर्तनी पुत्ररत्न असणे किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते. आताच्या काळात असं धर्मयुध्द होत नाही पण कौरवांच्या कुळातील दुर्जन पोटी जन्म घेतात व आपल्या वर्तनाने आपल्या मातापित्यांना मनस्तापाला कारणीभूत होतात. काही गैरमार्गाने जातात तर काही आपल्या मातापित्यांना वृध्दश्रमाची वाट दाखवतात. म्हणजे काय तर मुलगा असूनही एका अर्थाने ते निपुत्रीकच होतात. शंभर मुलांना जन्म देणारी महाभारतातील गांधारी आणि आधुनिक युगातील मुलाकडून वृध्दश्रमात ढकलली जाणारी स्त्री दोघींचेही दु:ख तेच आहे.
आपण म्हणतो काळ बदललाय. पण काळ बदलला म्हणून वृत्ती बदलली का हा खरा प्रश्न आहे. महाभारत हजारो वर्षांपूर्वी घडले पण त्यातील पात्रे नव्या रुपात येथे जन्म घेताना दिसतात. दुर्योधन दुषासन नव्य रुपात येथे जन्म घेताना दिसतात. तेथे द्रौपदीचे मदतीला श्रीकृष्ण धाऊन आला होता. या कलीयुगात अशा श्रीकृष्णाची वाट पाहणे धोक्याचे होईल. गांधारी प्रमाणे डोळे मिटून शांत राहू नका तर डोळे उघडे ठेवून वाटचाल करा. गांधारी प्रमाणेच महाभारतातील भिष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य अशा दिग्गजांनी डोळ्यांवर राजनिष्ठ रहण्याची पट्टी बांधली होती. व त्यामुळेच पुढे महाभारतातील भिषण युद्ध व नरसंहार झाला.
रामायण महाभारत हे आपले महान ग्रंथ आहेतच. पण आपण त्याकडे गांधारी बनून आंधळेपणाने न पहाता डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. महाभारतातील प्रत्येक पात्र आपल्याला शिकवण देत असते आपण फक्त डोळे उघडे ठेवून ती शिकवण अंगीकृत करणे हे महत्त्वाचे असते. गांधारीचा विचार त्या दृष्टीकोनातून करुन विषेषत: स्त्रीयांनी डोळ्यांवर पट्टी न बांधता डोळसपणे आपल्या आयुष्याकडे पहावे कोणताही निर्णय भावनिक दृष्टीने न घेता डोळसपणे घेणे ही आजच्या काळाची गरज आहे असे म्हणणे अधिक योग्य होईल.

सुरेश काळे
हो.९८६०३०७७५२
सातारा.

Thursday, 21 March 2019

प्रेमाचा ओव्हरडोस

    प्रेमाचा ओव्हरडोस
प्रेम हा शब्द उच्चारताच आपणासमोर एकठराविक स्त्री व पुरुष या दोघांमधील प्रेम एवढेच येते. पण मी आज ज्याविषयी लिहीणार आहे ते वात्सल्य किंवा ममता या सदरातील पालकांचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम या बाबत आहे. जगातील प्रत्त्येक व्यक्ती आपल्या मुलांवर जीव तोडून प्रेम करत असते. पण सध्या आसपास जर पाहिले तर या प्रेमाचा ओव्हरडोस किंवा अतीरेक होतोय का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.

मला माझ्या लहानपणी शाळेत सांगीतलेली एक गोष्ट आठवते. एकदा शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गुलाबाचे रोप दिले.मुलांना सांगीतले की घरी जाऊन प्रत्येकाने ते रोप जमीनीत किंवा कुंडीत लाऊन त्याला वेळचेवेळी पाणी देऊन सांभाळ करावा. एक महिन्याने सर्व मुलांचे घरी येऊन शिक्षक पहाणी करतील व ज्या मुलाचे रोप वाढले असेल त्याला बक्षीस मिळेल. वर्गातील एका मुलाने ते रोप घरी बागेत लावले व तो त्याची व्यवस्थित काळजी घेत होता.आपले रोप सर्वात चांगले व्हावे म्हणून त्याने खुपच काळजी घेतली. पण आपलेच रोप मोठे व्हावे या हव्यासापोटी तो त्या रोपाला रात्रंदिवस सारखे पाणी देत होता. त्याला उन्हाचा वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून प्लास्टीक अच्छादन घातले होते. त्याचा विपरीत परिणाम परिणाम असा झाला की पाण्याच्या अती वापरामुळे त्याचे रोपाची वाढ नीट झाली नाही. त्याला ऊन, वारा यांची सवय नसल्याने एका जोराच्या वादळी पावसात त्याचे रोप टिकाव धरु शकले नाही ते ऊन्मळून पडले.

आज एकुणच समाजातील पालकांचे मुलांच्या बाबतीत प्रेम पहाता ते त्या शाळेतील लहान मुलांप्रमाणे प्रेमाचा अतीरेक करतायत का असेच वाटते. हल्ली बहुतांश घरात मुलगा किंवा मुलगी एकच अपत्य असते. त्यामुळे ते घरातील सर्वांचे लाडके असतेच. आई वडील दोघेही नोकरी करणार असतील तर ते मुलांना वेळ देऊ शकत नाहीत मग त्याची भरपाई म्हणून महागडे खेळ, कपडे , हॉटेलींग याचा भडीमार केला जातो. विकेंडला आसपास एखाद्या वॉटर पार्कला ट्रीपवर नेले जाते. त्याला नामवंत शाळेत डोनेशन भरुन प्रवेश घेतला जातो. घरात चांगले संस्कार करणारे कोणी असतेच असे नाही. बहूतांशी अशा पालकांची मुलं अशीच विनासंस्कार मोठी होतात. मग पात्रता नसताना भल मोठ डोनेशनदेऊन मेडीकलला किंवा ईंजीनियरींगला प्रवेश घेतला जातो. कसं बस शिक्षण पुर्ण होते. मुले हुशार असतील तर चांगल्या प्रकारे शिक्षण पुर्ण करुन आई वडिलांचे नाव ऊंचावतात. पण अशी संख्या फार कमी असते. बहुतांश वेळी परिस्थिती ऊलट असते व मुल अती व फाजील लाडाने बिघडण्याची शक्यता जास्त असते. आयुष्यात करिअर ,पैसा ,प्रसिथ्दी असावी. त्याला महत्त्व आहेच पण त्यामागे धावत असतानाच ज्याच्या साठी हे आपण सर्व करतोय ती आपली मुल त्याहून जास्त महत्त्वाची आहेत. त्यासाठी त्यांचेवर लहानपणा पासून चांगले संस्कार होणे गरजेचं आहे. दोघांपैकी किमान एकाने तरी मुलांच्या लहान वयात सुरुवातीला आपलं करिअर थोडं बाजूला ठेवून लक्ष घातले पाहिजे. त्यासाठी नोकरी सोडून घरीच बसलं पाहिजे असं नाही पण वेळेवर घरी येणे संध्याकाळी थोडावेळ त्यांच्याशी गप्पा मारण त्याचा अभ्यास करवून घेणं त्याच्या अभ्यासातील किंवा अन्य काही अडचणी असतील तर त्या समजून घेणे येवढे जरी केलं तरी पुरेसे आहे. आणी ते सुध्दा मुलं पाचवी सहावी इयत्तेत जाईपर्यंत. त्यानंतर मुलांना समजू लागते व ती स्वतःहून योग्य निर्णय घेऊ लागतात. आई वडील आपल्या पाठिशी आहेत ही भावनाच त्यांना पुरेशी असते. शेवटी पैसा कितीही मिळवला तरीही कमीच वाटतो. पण त्याच्या पाठिमागे लागून आपले व आपल्या कुटुंबाचे किती हाल करायचे याचा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा आहे. कुटुंब सुखी तरच आपण सुखी एवढे जरी लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे. हे माझे वैयक्तिक मत मांडले आहे सर्वांना पटेलच असे नाही व तसा आग्रहही नाही.यावर मतभिन्नता असू शकते. कोवळया वयातील मुलांची सध्या सुरु असलेली असहाय्य फरपट पाहून वाईट वाटते म्हणून हा लेखन प्रपंच.

सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा

Wednesday, 20 March 2019

आनंदी जीवन

आनंदी जिवन

जिवन हे आनंददाई आहे त्याचा आनंद प्रत्येकाने भरभरुन घेणे अपेक्षित असते. याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःच्या घरापासुन केली तर सर्वच घर आनंदाने भरून जाईल. कुटुंबातील सर्व व्यक्ती आनंदात असल्याने सर्वांचे आपापसातील संबंध आपुलकीचे व जिव्हाळ्याचे राहतील. घरातील कौटुंबिक वातावरणाचा परीणाम संपुर्ण वास्तूवर होत असतो. घराची वास्तू सभोवतालचे वातावरण सर्वच आनंदी राहते.

आता प्रश्न उभा राहतो की आपण खरोखरच या आनंदाचा ऊपभोग घेतो का. याचे प्रामाणिक ऊत्तर द्यायचे झाले तर बहुतेकांचे ऊत्तर नाही असेच येईल.या सर्वांचे कारणाचा विचार करायला गेलो तर असंख्य कारणे समोर येतील पण त्यातील सर्वात महत्वाचे व बहुतांश ठिकाणी समोर येणारे कारण म्हणजे पैसा किंवा संपत्ती. आपणास जगण्यासाठी खरोखर किती पैशाची आवश्यकता आहे याचा कोणी गांभीर्याने विचार करताना आढळून येत नाही. संपत्तीचा निव्वळ हव्यास हेच खरे कारण त्या मागे असते.  व त्या अती हव्यासापाई आपण जिवनातील निखळ आनंद घेऊ शकत नाही याचीही कुणाला फारशी खंत वाटत नाही.

सध्याची महानगरातील परीस्थीती तर अतिशय वाईट व मनाला क्लेश देणारी आहे. पती व पत्नी दोघेही नोकरी करणारे घरात दरमहा लाखात पैसे येत असतात. एकुलते एक मुल, मोठा चार पाच खोल्यांचा फ्लॅट, चार चाकी गाडी अशी सर्व भौतिक सुखांची रेलचेल. पण खरोखरच त्याचे कुटुंब सुखी व आनंदी कुटुंब म्हणता येईल का. घरात दरमहा भरपूर पैसा येतो एवढेच खरे पण त्यापायी जिवनातील किती आनंदाच्या क्षणांना पारखे झालेत याचा विचार केला तर त्यांचे जिवनाचा ताळेबंद हा तुटीचा असल्याचे दिसून येईल व ही तुट भरून काढण्यासाठी प्रत्येक विकेंडला कोठे तरी बाहेर जाणे व त्या तुटीची भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो. पण अशा वरवरच्या मलमपट्टीने ती आनंदाची तुट भरुन निघते का? त्या विकेंडला जो अनावश्यक व अति खर्च होतो तो भरून काढण्यासाठी पुन: आठवडाभर कामाला जुंपून घेणे. ही न संपणारी जिवघेणी धडपड कशासाठी व यातून खरोखरच आनंद मिळतो का याचा कोणी विचारच करत नाही.

पैशापेक्षाही मोठा आनंद जिवनात हरघडी असतो फक्त त्याची जाणीव असणे व तो आनंद मिळवण्याची आंतरीक तळमळ असणे जरुरीचे आहे. वरील ऊदाहरणातील पती, पत्नी दोघेही नोकरी करणारे. दोघांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या असतील तर एक सकाळी लवकर बाहेर पडणार तर दुसरी व्यक्ती त्या वेळी झोपेत असणार व दुसरी व्यक्ती जेव्हा कामावरुन घरी येईल त्या वेळी पहिली व्यक्ती दमून झोपलेली असणार. दोघांचे साधे संभाषण जिथे होत नाही तिथं प्रेमाच्या चार गोष्टी बोलायला वेळ कुठून देणार. मुल पाळणाघरात किंवा सांभाळायला बाई ठेवलेली. त्याला आई वडिलांचे प्रेम कुठून मिळणार. अशा वेळी त्या मुलास एकटे ठेऊन आपण त्याच्या बालपणाचा आनंदच हिराऊन घेत असतो त्याचा परीणाम नकळत त्या मुलावर होत असतो. त्यातुनच अशी मुले एककल्ली होण्याचा धोका असतो. तसेच एकुलता एक असल्याने खर्चसाठी भरपू पैसे दिले जातात ज्याचा हिशोब मागीतला जात नाही. त्या मुळे पैसे टाकले की सर्व मिळते अशी भ्रामक समजूत त्या मुलाची होते काही वेळा नको त्या वयात हाती पैसा व घरात प्रेमाचा अभाव याची परीणीती व्यसनाधिनता व गुन्हेगारी कडे मुल वळण्याचा धोका असतो. पण याचा कोणी विचारच करत नाही.वास्तविक लहान मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्यात खुप आनंद दडलेला असतो. त्याचे बोबडे बोल , हाताला धरुन दुडुदुडू चालणे, त्याची अंघोळ पाण्यात खेळणे ईत्यादी प्रत्येक क्षणात आनंद दडलेला आहे. व पैशामागे पळताना त्याचे आईवडिल या स्वर्गीय आनंदास मुकतात. पण हे सर्व मानले तर अन्यथा पैशामागे लागलेल्यांना ह्याचे महत्व कसे कळणार.

वासतविक जिवनात आपणास खरोखर किती पैशाची आवश्यकता आहे. या बाबत नुकताच नोटबंदीच्या काळात अनुभवलेला किस्सा आवर्जून नमूद करावा वाटतो. सेव्हींग खात्यातील रक्कम काढताना आठवड्यात फक्त रु.२४०००/- काढण्याची परवानगी होती. अर्थात बँकांकडे तेवढी रक्कम सुध्दा ऊपलब्ध नसल्याने प्रत्येक बँक काही ठराविक रक्कम ५००० ते १०००० पर्यंत देऊ शकत होत्या. माझ्या बँकेत आम्ही एकावेळी रु.१००००/-  देत होतो. दुसरे दिवशी पुन्हा रु. १००००/- अशी विनंती करत होतो. बहुतांशी लोक आमची विनंती मान्य करीत. एकदा एक खातेदार त्या बाबत माझ्याशी हुज्जत घालू लागला. त्यावेळी एका अशिक्षीत खातेदाराने त्याला समजावून सांगत असता जे सांगितले ते ऐकून खरोखर त्या अशिक्षीत माणसाच्या विचाराने मन सुन्न झाले. तो म्हणाला आहो आपल्याला आपल्या चार माणसाच्या कुटुंबास चांगल्या पध्दतीने जगण्यासाठी किती पैसे लागतात, फार तर महीन्याकाठी २०००० ते २५००० , मग आज दहा हजार नेले पुन्हा आठवड्यानी दह हजार नेले तर चालू शकेल. आपण आपल्या गरजा विना कारण वाढवल्यात. पुर्वी आजच्या एवढ्या सोई नव्हत्या तरीही माणसं सुखात रहात होतीच ना. त्याचे विचार ऐकून मन क्षणभर सुन्न झाले. कोठे या अशिक्षीत माणसाची विचारसरणी व कोठे आजच्या सुशिक्षित म्हणवून घेणारी पैशापाठीमागे धावणारी तरुण पिढी.

आपले जिवन क्षणभंगूर आहे. त्या जिवनाचा परिपूर्ण आनंद घ्या. निसर्गाने सम्रुध्द अशा नदि पर्वत जंगल यांच्या सानिध्यात वेळ घालवा. आई, वडील  मुले मित्र मैत्रीणी यांना वेळ द्या. त्यांच्या सुख दु:खात सहभागी व्हा. जिवनाबद्दल वेगळ्या पध्दतीने विचार करा तुम्हाला तुमचे जिवन खुपच आनंददायी वाटेल व तुमचे जिवन परीपुर्ण होईल.एकदा आवश्य विचार करा.

सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.

Tuesday, 19 March 2019

पार्सल संस्कृती

         पार्सल संस्कृती
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असे श्र्लोक म्हणत घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची आपली भारतीय संस्कृती कधी काळी होती असे म्हणण्याची आता वेळ आलेली आहे असे म्हणले तर फारसे वावगे होणार नाही. पण या पार्सल संस्कृतीला नावे ठेवण्यापेक्षा ती आता बहुतेक शहरात एक आवश्यक बाब बनली आहे हे तितकेच खरे आहे. आपण सर्वांनीच ती बाब मान्य केली पाहिजे. पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. मुले व घरातील कर्ती व्यक्ती १० वाजता जेवायला बसत. नंतर मुले शाळेत व वडील नोकरी व्यवसाय करणेसाठी बाहेर पडत. सायंकाळी ५.३० नंतर मुले शाळेतून घरी येत असत. नोकरीतील व्यक्ती सुध्दा बहुधा ६.०० ते ६.३० पर्यंत घरी येत असे. त्यानंतर रात्रीचे जेवण बहुधा ८.३० चे सुमारास सर्व एकत्र घेत.
पुढे काळ बदलला. एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होत गेली. नोकरीच्या शाळेच्या वेळा बदलत गेल्या. सातारा, सांगली, सारख्या लहान गावांतील तरुण नोकरीसाठी पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद अशा मोठ्या शहरात स्थलांतरीत झाले. बहुतांशी पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे. कामाच्या वेळा वेगवेगळ्या त्यामुळे घरी एकत्रीत स्वयंपाक व एकत्र जेवण ही बाब दुर्मीळ होत गेली. संध्याकाळी ( रात्री म्हणणे जास्त संयुक्तिक होईल कारण घरी यायला ८.३० ते ९.०० वाजून जातात ) घरी आल्यावर स्वयंपाक करणं कठीण बनले. आणी मग इथेच पार्सल संस्कृतीचा उदय झाला. संध्याकाळी ऑफीसमधून घरी येताना जेवणाचे पार्सल घेऊन येणे व घरी आल्यावर जेवण करणे हा एक रुटीनचा भाग बनला. काही वेळा ऑफीस ते घर या वाटेवर जर हॉटेल नसेल तर अडचणी येऊ लागल्या व त्यासाठी मग ऑनलाईन बुकींग ही पुढची पायरी आली. ऑफीसमधून बाहेर पडताना ऑर्डर द्यायची घरी येईपर्यंत जेवण घरपोच अशी व्यवस्था सुरु झाली. जी आता बऱ्यापैकी रुजू लागली आहे.
हा झाला एक नोकरी करणाऱ्यांसाठी मोठ्या
शहरातील विषय. लहान शहरात व महानगरात सुध्दा जेष्ठ नागरिक मुले दूर गेल्यामुळे एकटे किंवा पती-पत्नी दोघेही रहात असतात. वयोमानानुसार आता त्यांना किराणा सामान भाजीपाला आणणे व त्याची ऊस्तवार हा व्याप होत नाही. तसेच किती आणायचे व किती करायचे हाही एक प्रश्नच असतो. मग त्यांच्यासाठी म्हणून अशा लहान गावात सुध्दा काही हॉटेल व्यावसायिकांनी तसेच काही ठिकाणी घरगुती स्वरुपात घरपोच डबा देणे सुरू केले. फोन करून काय पाहिजे ते सांगीतले की आपल्या वेळेला जेवण हजर. या वितीरिक्त आजारी व हॉस्पिटल मध्ये दाखल पेशंटच्या नातेवाईकांना जेवण पोहोच करणेसाठी ही पार्सल पध्दती उपयुक्त असल्याने त्यासाठी सुध्दा ही आवश्यकता आहेच.
त्यामुळे एकंदरीत विचार करता कोणी काही म्हणले तरी पार्सल संस्कृती ही आता आपल्या जिवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे व ती आपण टाळू शकत नाही. उलट मी तर म्हणेन ती आता आपली गरज झाली आहे व काळाची गरज आहे त्यामुळे तिचे स्वागतच करायला हवे.

सुरेश काळे
सातारा
मो.९८६०३०७७५२

Monday, 18 March 2019

बाजारु शिक्षण की शिक्षणाचा बाजार

बाजारु शिक्षण की शिक्षणाचा बाजार

नुकताच १० वी चा निकाल जाहीर झाला व बोर्डाच्या पोतडीतून एक एक विक्रमादित्य बाहेर पडू लागले. कोणाही मुलाला विचारले की आवाक करणारा आकडा ऐकायला मिळायचा. कोणाला ९५ तर कोणास ९७, ९८ % मार्क मिळाले होते. हे ऐकून आमच्या वेळचे मार्क आठवून असे वाटले की आताची नवीन पिढी आमच्या पेक्षा खुपच बुध्दिमान असावी व मला माझ्या एस.एस.सी. च्या मार्काची लाज वाटायला लागली.

वास्तविक तो एक भ्रम होता व लगेचच दोन दिवसात तो भ्रमाचा भोपळा फुटला. माझे एक स्नेही जे एक खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होते त्यांची रस्त्यात गाठ पडली पण ते नेहमी सारखे मोकळेपणाने बोलत नव्हते. बरेच वेळा खोदून विचारल्यावर म्हणाले चल जरा हॉटेलमध्ये चहा घेऊ मग सांगतो. आम्ही हॉटेलमध्ये जाऊन चहाची ऑर्डर दिली पण अजूनही त्यांची अस्वसथता जात नव्हती शेवटी मी म्हणालो अरे प्रॉब्लेम्स काय आहे ते तरी सांग म्हणजे काही मार्ग निघू शकेल.

त्यावर त्यांनी जे सांगितले ते ऐकून अक्षरशः डोके चक्रावून गेले. त्यांचा मुलगा नुकताच १२ वी सायन्स पास झाला होता व त्याला मिळालेल्या गुणांमुळे ते पुरते निराश वाटत होते. मुलाला १२ वी मधे ६२% मार्क मिळाले होते मेडिकल एन्ट्रन्सलाही असेच मार्क होते , सीईटी मधे तर असे मार्क की ईंजीनिअरींगचे दरवाजे बंद झाले होते. मी त्याला अनेक पर्याय सांगितले की त्याला, बी. फार्मसी , प्लेन बी.एस.सी. करु दे. त्यानंतर सुधदा त्याला एम.एस.सी. पी.एच.डी. करता येईल तसेच आवड असल्यास तो रिसर्च करु शकेल. तसेच पदवी नंतर तो एम.बी.ए. करु शकतो त्यामुळे तो एखाद्या चांगल्या रासायनिक किंवा औषधनिर्माण कंपनीत करीअर करु शकेल. एम.बी.ए. नंतर तो एखाद्या बँकेत अधिकारी म्हणून सुध्दा ऊत्तम करीअर करु शकतो.

असे वेगवेगळे पर्याय मी सुचवित होतो पण माझ्या मित्राच्या ते काही फारसे पचनी पडले होते असे वाटले नाही. त्यामुळे माझ्या पर्यायावर त्याने काही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. कारण त्याच्या डोक्यात मुलाला डॉक्टर करायची जी क्रेझ होती ती त्याला वस्तुस्थिती मान्य करण्यापासून दूर नेत होती. नंतर आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला व मी घरी आलो. घरी आल्यावर पुढील ४ ते ५ दिवस मीही अस्वस्थ होतो. मित्राच्या हट्टापायी मुलाचे नुकसान होऊ नये असे राहून राहून वाटत होते. मला दोन वर्षांपूर्वीची घटना स्पष्ट आठवत होती. हा मुलगा त्यावेळी ८२% गुण मिळवून १० वी पास झाला होता. त्याच्याशी बोलताना तो कला व वाणीज्य विषयांवर बोलत होता. त्याच्या एकंदरीत बोलण्यावरून त्याला शास्त्र शाखेची फारशी आवड नसल्याचे दिसत होते व तो वाणिज्य शाखेकडे जाईल असेच वाटत होते. त्यानंतर आमची बरेच दिवसात गाठ पडली नव्हती. व मीही ही गोष्ट विसरून गेलो त्यानंतर जेव्हा मित्राची गाठ पडली त्यावेळी मुलाने ११वी सायन्स ला प्रवेश घेतल्याचे समजले व थोडे आश्र्चर्य वाटले. पण मी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. व आज आता ही परिस्थिती की पाच लाख डोनेशन व वार्षीक सहा लाख फी भरून खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली. खाजगी मेडिकल कॉलेजमधील शिक्षणाचा दर्जा काय असतो व तेथे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अनुभव किती मिळतो हा विषय त्याहून वेगळा. यानंतर पाच वर्षांत तो मुलगा डिग्री घेऊन बाहेर येईल. कारण इतकी फी घेणारी कॉलेज मुलांना नापास करतच नाहीत. तेथील व्यवहार उघड आहे डोनेशन, भरपूर फी मोजा व डिग्री मिळवा. पण जेव्हा तो मुलगा डिग्री मिळाल्यावर प्रत्यक्ष जिवनात डॉक्टर म्हणून करिअर सुरू करेल त्यावेळी जी ऊत्कृष्टशै क्षणिक करिअर असणाऱ्या डॉक्टर लोकांशीत्या ला स्पर्धा करावी लागेल त्यावेळी तो त्या स्पर्धेत कितपत टिकाव धरेल हा मोठा गहन प्रश्न उभा राहतो.

वरील ऊदाहरण हे  सर्व विद्यार्थी व पालकांनाही विचार करावा असेच आहे.मुळात आपली सध्याची शिक्षणपधदती व परीक्षा पध्दतीचा विचार करायला हवा. ईयत्ता १० वी च्या परीक्षेची काठींण्य पातळी किती आहे. त्यातून खरोखर मुलांच्या बुध्दीमत्तेचा कस लागतो का. १० वी परीक्षेत मिळणारे गुण हे खरोखर त्या विद्यार्थ्याचे किती व त्यात शाळेचा हातभार किती हे सर्व विचारात घेणे गरजेचे आहे. याचा कोणताही विचार न करता मेंढराप्रमाणे सर्व विद्यार्थी शास्त्र शाखेत प्रवेश घेतात. बरेच वेळा असे दिसते की पालकच पाल्याला शास्त्र शाखेत प्रवेश घेण्यासाठी जबरदस्ती करतात. १० वी पास १५ वर्ष वय असलेला मुलगा स्वतः कोणताही निर्णय घेत नसतो तर बहुतांश वेळा पालकांचा निर्णय पाल्यावर लादला जातो. त्याची आवड काय आहे, कोणत्या विषयात त्याला चांगली गती आहे याचा जराही विचार केला जात नाही.

आता पालक तरी असे का वागतात याचा विचार केला तर त्याला विविध कारणे आढळून येतात . त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्यांची स्वताची अपुर्ण महत्वाकांक्षा. जे आपण करु शकलो नाही ते आपल्या पाल्याने करावे ही सुप्त ईच्छा पालकांना त्यांचा निर्णय पाल्यावर लादण्यास भाग पडते. त्या नंतरचे कारण म्हणजे तुलना. माझ्या शेजारच्या घरातील, माझ्या भावाचा ,बहीणीचा , आणी त्यहून महत्त्वाचे म्हणजे माझ्या हाताखाली काम करणाऱ्याचा पाल्य ईंजीनिअरींगचे किंवा मेडिकलचे शिक्षण घेतोय तर मग माझाही पाल्य डॉक्टर ईंजीनीअर झाला पाहिजे.

ईंजीनिअरींगची सद्यस्थिती काय आहे, किती जणांना चांगला जॉब मिळतो याकडे कोणाचेही लक्ष दिसत नाही. दरवर्षी लाखांच्या घरात मुले ईंजीनीअर होतात पण त्यातील मोजक्या व सर्वोत्तम अशा साधारण १० % मुलांना चागल्या मोठ्या संस्थेत मोठ्या पगाराची नोकरी मिळते बाकीचे ९० % विद्यार्थी १०००० ते १२००० पगारावर राबत असतात. व बरेच वेळा त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा त्यांच्या कामाशी काहीच संबंध नसतो. अशावेळी त्या मुलांची मनस्थिती काय होत असेल याचा विचार करण्याची कोणीच तसदी घेत नाही. माझा मुलगा किंवा मुलगी ईंजीनीअर अथवा डॉक्टर झाल्याच्या आनंदात सर्वजण मश्गुल असतात. एखादा कमकुवत मनाचा विद्यार्थी नैराश्याने ग्रस्त होऊन त्याचे आयुष्य बरबाद होऊन जाते याचा कोणी विचारच करत नाही.

मेडिकल क्षेत्र तर त्याहून कठीण. डॉक्टर झाल्यावर त्या क्षेत्रात जम बसायला किती कालावधी लागु शकतो हे कोणीही सांगू शकत नाही. ज्या पाल्याचे आई किंवा वडील या क्षेत्रात असतील त्यांना थोडे जम बसणे सुलभ जाते. अन्य सर्वांना फार कठीण परीस्थीतीला सामोरे जावे लागते. परत नुसती एक पदवी पुरेशी नसते पुन्हां कोणत्या तरी एक विभागात पदव्युत्तर शिक्षण घेऊन प्रावीण्य मिळवावे लागते. काही सरकारी महाविद्यालय  वगळता ईतर संबंधित महाविद्यालये शिक्षणाचा बाजार मांडून बसलेली आहेत . तेथे आवश्यक सोई सुविधांची सुध्दा वानवा असते अशा संस्था विद्यार्थ्यांना व पालकांना आर्थिकद्रुष्ट्या पिळून काढताना दिसतात.

त्यामुळे  खरोखरच वरील सर्व वस्तुस्थिती विचार करायला लावणारी आहे. त्याला आपली शिक्षण पध्दती व त्याही पेक्षा १० वी ची परीक्षा व गुणदान पध्दती मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे असे वाटते. त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आपला पाल्य खुप हुशार असल्याचे भासते व ते कुवतीबाहेरील क्षेत्रात विनाकारण गुरफटून जातात. सायन्स वितीरीक्त ईतरही शाखेत चांगले करिअर करता येऊ शकते हे आता कोणीतरी पटवुन देण्याची नितांत गरज आहे. याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करावा व आपल्या पाल्यावरील अनावश्यक ताण कमी करुन एक नवीन सुद्रुढ युवा पिढी निर्माण करावी त्यातच आपल्या देषाचे ऊज्वल भविष्य आहे असे वाटते.

सुरेश काळे
मो. ९८६०३०७७५२
सातारा

Sunday, 17 March 2019

५०१ पाटी

५०१ पाटी

सध्याचे युग हे जाहिरातीचे युग म्हणून ओळखले जाते. आपण रेडीओवर रोज विविध प्रकारच्या जाहिराती पहात असतो किंवा टी.व्ही.वर रोज नवं नवीन जाहिराती पहात असतो. पण एक काळ असा होता की जाहिरात म्हणले की प्रिंट मिडिया वृत्तपत्र ,मासिक अथवा अन्य मुद्रीत प्रकार हा एक उपाय होता किंवा एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी मोठा जाहिरात फलक लावण्यात येत असे व पेंटर त्यावर त्या उत्पादनाची माहिती लिहीत असे. हा जाहिरातींचा फलक महत्त्वाच्या रस्त्यावर अथवा चौकात लावला जात असे. काही दिवसांनी त्या जाहिरात फलकावर अन्य एखाद्या उत्पादनाची जाहिरात केली जात असे. पण एखाद्या ठिकाणी एका ठरावीक उत्पादनाची जाहिरात वर्षानुवर्षे केली जाऊन त्या जागेला विशीष्ठ जाहिरातीच्या नावाने ओळखले जाण्याचे भारतातील किंवा जगातील एकमेव ठिकाण म्हणजे सातारा येथील ५०१ पाटी.

साताऱ्यात महत्त्वाचे दोन रस्ते एक खालचा रस्ता  व एक वरचा रस्ता वरच्या रस्त्याला राजपथ असे म्हणले जाते. राजपथावरील देवी चौक येथून  जाणारा रस्ता जेथे खालच्या रस्त्याला मिळतो त्या चौकाला ५०१ पाटी किंवा ५०१ चौक असे संबोधले जाते. आत्ता या घडीला जर आपण तेथे गेलात तर तेथे अशी कोणतीही पाटी अस्तीत्वात नाही. पण तरीही त्या चौकाला ५०१ पाटी असेच संबोधले जाते.

माझ्या आठवणी प्रमाणे तो १९६५ ते १९६८ चा काळ असावा त्यावेळी कपडे धुण्यासाठी डिटर्जंट पावडर वा तत्सम प्रकारचे साबण अस्तीत्वात यायचे होते. त्याकाळी कपडे धुण्यासाठी एकमेव प्रसिद्ध साबण म्हणजे ५०१ साबण बार. साधारण लांबी १० ईंच असावी. त्यावर प्रत्त्येक एक ते दीड ईंचावर खुण केलेली असायची व वापरणाऱ्याने त्याला जशी पाहिजे तशी कापून वडी कापून घ्यायची. काही छोटे दुकानदार एक वडी कापून सुध्दा विकत देत असत. तर अशा या साबणाची जाहिरात तेथे एका मोठ्या फलकावर करून तो उंच करून लावलेला असायचा. ऊन अथवा पावसाने काही दिवसांनी त्या जाहिरात फलकावरील अक्षरे खराब होत मग पुन्हा पेंटर तिथे शिडी लावून नव्याने पेंटींग करत असे. व मग ती पाटी पुन्हा दिमाखात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत असे. वर्षानुवर्षे हा परिपाठ सुरु होता. त्यामुळे तो चौक व ती पाटी हे समीकरण इतके घट्ट झाले की त्या चौकाला लोकांनी ५०१ पाटी असे नाव दिले. त्या काळात कोणाला तिथे जायचे असल्यास ५०१ पाटीकडे चाललोय असं आपोआप म्हणले जायचे.

कालौघात कपडे धुण्यासाठी विविध प्रकारचे डिटर्जंट साबण व पावडर बाजारात आल्या. धुण्यासाठी मशीन आले व एक काळ गाजवलेला ५०१ साबण सुध्दा काळाच्या पडद्याआड गेला. त्या जागेवर आता ती पाटी सुध्दा नाही पण तो चौक व त्यारुपाने ५०१ पाटी हे नाव मात्र सातारच्या इतिहासात अजरामर झाले हे नक्की.

सुरेश काळे
मो. ९८६०३०७७५२
सातारा

Friday, 15 March 2019

निवृत्ती

निव्रुत्ती

निव्रुत्ती हा शब्द आपण ऐकला की आपल्या समोर फक्त सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात २५ -- ३० वर्षे नोकरी करुन वयाची ६० वर्ष पुर्ण झाल्यामुळे त्या नोकरीतून मुक्त होणारी एक व्यक्ती ऊभी राहते. वास्तविक निव्रुत्तीमधे तेवढा एकच अर्थ अभिप्रेत नाही. खेळात अनेक वर्ष ऊत्तम कामगिरी केल्या नंतर सुध्दा एक ठराविक वय झाल्यावर खेळ जरी खराब होत नसला तरी वय परत्वे शारीरिक हालचाली मंदावतात व तरुण पणातील जोशपुर्ण खेळ त्या खेळाडुकडून होऊ शकत नाही व त्याला आपला खेळ थांबवावा लागतो. त्या वेळी तो खेळाडू ६० वर्ष झालेली व्यक्ती नसते.

आत्ता आपण ज्या निव्रुत्ती विषयी विचार करणार आहोत ती प्रामुख्याने सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी केल्या नंतर ठराविक वय ५८/६० पुर्ण केल्यामुळे नोकरीचा कालावधी समाप्त होऊन होणारी निव्रुत्ती. कोणीही व्यक्ती मग ती सरकारी क्षेत्रात असो किंवा खाजगी क्षेत्रात असो त्याला एक ना एक दिवस सेवा निव्रुत्त व्हावे लागते. नोकरीतील असलेल्या अधिकार पदानुसार वयात कमी जास्त होऊ शकते पण निव्रुत्त व्हावे लागतेच.

सर्व प्रथम प्रश्र्न येतो निव्रुतीचा विचार कधी करावा. त्याला ठराविक असे ऊत्तर नाही. पण मला विचाराल तर निव्रुत्तीचा विचार ज्या दिवशी आपण नोकरीत हजर होतो त्या दिवशीच करणे शहाणपणाचे ठरु शकते. विचार करताना पहिला मुद्दा येतो आर्थिक स्थैर्य. निव्रुत्तीनंतर आपण आर्थिक द्रुष्ट्या कोणावरही अवलंबून राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या बाबत विचार करताना आपणास निव्रुत्ती नंतर पेन्शन मिळणार आहे का नाही हे विचारात घेणे गरजेचे आहे. पेन्शन मिळणार असेल तर निव्रुत्ती नंतर बरेचसे प्रश्र्न सुसह्य होतात. तथापि ज्यांना पेन्शन मिळणार नसेल त्यांनी त्या बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्या द्रुष्टीने सुरुवाती पासुन नियोजन करणे योग्य ठरते. आपल्या मराठीत थेंबे थेंबे तळे साचे अशी म्हण आहे. त्या मुळे सुरुवात कितीही लहान प्रमाणात असली तरी ती वेळेवर सुरु करणे महत्वाचे आहे. त्या योगे आपण निव्रुत्ती पर्यंत योग्य नियोजन करून निव्रुत्तीनंतरच्या आयुष्याची तजविज करु शकतो व निव्रुत्ती नंतरचे आपले जिवन सुसह्य करू शकतो.

आर्थिक नियोजना नंतर पुढचा प्रश्र्न असतो शारीरिक स्वस्थ्य. वयाच्या साठी नंतर वय परत्वे येणारे आजार व त्यावरील ऊपचार याचा गांभीर्याने विचार करावा. रोज आपली दिनचर्या ठरवून शक्यतो त्या प्रमाणे दैनंदीन जिवन राहील्यास फारशा गंभीर तक्रारी निर्माण होत नाहीत. तसेच आपल्या डॉक्टरांना वेळचे वेळी भेटायला जाणे व त्यांचे सल्यानुसार वेळचेवेळी आवश्यक तपासणी व औषोधोपचार घ्यावेत. आपल्या आजारांचा बाऊ करू नये पण दुर्लक्षही करु नये. त्या मुळे आपण आपले आयुष्य आनंदाने घालवू शकू.

त्या नंतर सर्वात महत्वाचा विषय कौटुंबिक संबंध. आपण नोकरीत आयुष्यातील बराचसा कालावधी व्यतीत केलेला असतो व घरातील बरीचशी कामे पुर्ण करण्याची जबाबदारी आपल्या पत्नीने घेतलेली असते. निव्रुत्तीनंतर जी शक्य आहेत ती कामे आपण करून  आपल्या पत्नीचा कमाचा भार थोडा हलका करु शकतो व तो वाचलेला वेळ ती तिच्या आनंदासाठी व्यतीत करु शकेल त्यामुळे तिलाही थोडे समाधान मिळेल. मुले मोठी झालेली असतात. बहूधा त्यांची लग्न कार्य उरकलेली असतात. नोकरी निमित्त मुलगा त्याचे पत्नीसह वेगळ्या गावी रहात असेल तर त्याची वेळोवेळी विचारपुस करा त्याच्या अडचणीचे वेळी आवश्य हजर राहून शक्य होईल ती मदत करा. सल्ला विचारला तर आवश्य मोकळेपणाने आपले मत मांडा पण आपले मत त्यांचेवर लादू नका. आपल्या काळातील गोष्टींची तुलना करणे पुर्णपणे टाळा. कारण काळ बदलला आहे याचे सतत भान ठेवा. आपल्या काळातील एखादी चैनीची बाब आज गरज असू शकते त्यामुळे विनाकरण तुलना करून वाद निर्माण हैणार नाहीत याची काळजी घेतल्यास सर्व जण आनंदात राहू  शकतो. मुलीचे लग्न झाले असलेस वेळोवेळी तीची चौकशी करून आपण कायम तीच्या पाठीशी आहोत याची तिला तसेच तिच्या कुटुंबातील सर्वांना जाणीव अवश्य करुन द्यावी. पण शक्यतो तिचे संसारात अती हस्तक्षेप टाळणे ऊचीत होईल. त्यामुळे दोन्ही कुटुंबात चांगले स्नेहसंबंध निर्माण हैतील.

आता राहता राहतो प्रश्न आपला वेळ कसा घालवणे. आपल्या शरीराला वर्षानुवर्षे एक चाकोरीबध्द जिवन जगण्याची एक सवय लागलेली असते. साधारण निम्मे आयुष्य आपण एका ठराविक पध्दतीने घालवलेले  असते. त्यामुळे लगोलग त्यात बदल करणे सुरुवातीस निश्र्चीतच कठीण जाईल. त्यामध्ये प्रयत्न पुर्वक हळूहळू बदल करावा. आपले बरेच काही छंद आवडी असतात ज्यांना आपण नोकरी मुळे मुकलेलो असतो. आपण आपले मन आपल्या आवडीचे छंदात गुंतवल्याने आपणास आनंद तर मिळेलच आपला वेळही चांगला जाईल. सिनेमा, नाटक पहाणे , वाचन करणे यामुळे आपले मन आपणास प्रसन्न ठेवता येईल. वर्षातून एखादी छोटीशी सहल करुन आपल्या पत्नीसही आनंद देऊ शकतो.

निव्रुत्ती नंतरचे जिवनाचा विचार करताना अशा अनेक गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो. तथापि किमान वर उल्लेख केलेल्या बाबी जरी आचरणात आणल्या व त्या प्रमाणे प्रत्येकाने विचार करून योग्य ती काळजी घेतली तर आपले निव्रुत्ती नंतरचे जिवन आपण खचीतच आनंदात व सुखात घालवू शकू अशी प्रत्येकाने खात्री  बाळगण्यास हरकत नाही.

सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा.


Thursday, 14 March 2019

मित्र व मैत्री

मित्र व मैत्री

मित्र अथवा मैत्री हा शब्द ऊच्चारताच आपल्या नजरेसमोरअनेक मित्र व त्यांची मैत्री ऊभी रहाते. मित्र किंवा मैत्री करताना कधीही ऊच्च निच, जात, धर्म स्त्री पुरुष असा विचार मनात येत नाही. किंबहूना मैत्री केली जाते म्हणण्यापेक्षा मैत्री होते असेच म्हणणे जास्त ऊचीत होईल. आपण पौराणिक कालखंड विचारात घेतला तर आपल्याला सर्वप्रथम श्रीकृष्ण व सुदामा यांची मैत्री पहावयास मिळते वास्तविक दोघांची मैत्री होण्यासारखे काहीच साधर्म्य नाही. श्रीकृष्ण हे एक क्षत्रिय राजकुमार तर सुदामा हा एक सर्वसामान्य ब्राह्मण . दोघांच्या आर्थिक परीस्थीतीत जमीन अस्मानाचे अंतर पण मैत्रीत हे सर्व गौण होते व म्हणुनच मैत्री म्हणताच आपल्या नजरेसमोर पहिले ऊदाहरण श्रीकृष्ण व सुदामा यांचेच येते.

महाभारतातील मैत्रीचे दुसरे मोठे ऊदाहरण म्हणून आपल्या नजरेसमोर येते ते म्हणजे दुर्योधन व कर्ण. एक राजकुमार तर दुसरा एक सामान्य सुतपुत्र. पण एकदा मित्र मानल्यावर ती मैत्री दोघांनी शेवटपर्यंत निभावली. दुर्योधनाने कर्णाला अंग देशाचा राजा केले तर कर्णाला शेवटी आपण जेष्ठ पांडव असल्याचे समजून सुध्दा त्याने शेवटपर्यंत मैत्री निभावतात प्रत्यक्ष आपल्या भावाशी युध्द करूनमैत्री साठी आपले प्राण अर्पण केले.

आपल्या धर्मग्रंथात व ईतीहासात अशी अनेक ऊदाहरणे आपल्याला आढळून येतील. व त्यातील प्रत्येक मैत्रीचे वेगवेगळे कंगोरे आपणास दिसून येतील. वरील महाभारतातील दोन ऊदाहरणे मैत्रीच्या ऊच्चतम पातळीवरील असली तरीही त्या मैत्रीची परीणीती भिन्न प्रकारे झाल्याचे आढळते कारण त्या मैत्रीतील भावना वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. श्रीकृष्ण व सुदामा यांची मैत्री ही भक्तीच्या स्वरूपातील होती त्यामुळे सुदमाचा भाग्योदय झाला तर दुर्योधन व कर्ण यांची मैत्री ही ऊपकाराच्या ओझ्याखाली दबलेली होती. त्यामुळे त्याची परीणीती ही दोघांच्या विनाशात झाली.

वरील दोन ऊदाहरणे ही प्रातिनिधिक आहेत. प्रत्यक्ष जिवनामधे आपणास मैत्रीचे विविध अविष्कार पहावयास मिळतात. व त्यांच्या स्वरूपानुसार ढोबळ मानाने पुढील विविध प्रकार आढळून येतात.

बालमैत्री:
लहानपणी साधारण वय वर्षे१२ पर्यंतच्या मैत्रीस बालमैत्री असे म्हणता येईल. मैत्रीच्या विविध स्वरुपा पैकी ही मैत्री ही खरी निरपेक्ष मैत्री म्हणता येईल. येथे उच्च निच, गरीब श्रीमंत, जात, धर्म या कशाचाही विचार नसतो म्हणुनच अशी मैत्री ही कायम स्वरूपात राहणारी अशी असते. कालौघात जरी नोकरी व्यवसायामुळे भेट झाली नाही तरी ती मैत्री मनाच्या एका गाभाऱ्यात अबाधित असते. त्यामुळे जेव्हां कधी बालपणीचा आपला मित्र अचानक बरेच वर्षानंतर भेटतो तेव्हा दोघांना झालेला आनंद केवळ अवर्णनीय असतो.
युववस्थेतील मैत्री:
ही मैत्री साधारणपणे वयाच्या १८ वर्षानंतर महाविद्यालयीन जिवनात निर्माण होते. मात्र ही बहुधा एका विशिष्ट निकषांवर झाल्याचे आढळून येते. ज्यांची आवड एक आहे, सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक विचारसरणी एक सारखी आहे अशा तरुणांची पटकन मैत्री होते. महविद्यालयातुन बाहेर पडल्यानंतर यातील एखाद्याचीच मैत्री पुढे टिकून रहाते.
व्यवसाईक मैत्री:
एका  समान व्यवसायातील व्यक्ती विविध व्यवसाईक कारणांमुळे वेळोवेळी एकत्र येत असतात. त्यावेळी व्यवसायातील विविध प्रश्नांचा विचार होत असतो. यावेळी काही सम व्यवसाईकांची एकमेकांशी विषेश जवळीक निर्माण होते, मैत्री होते व काही जणांच्या बाबतीत कौटुंबीक स्नेह संबंध निर्माण होतात. व काही वेळा असे स्नेह संबंध नात्यात परावर्तीत होतात.

कार्यालयीन मैत्री:
आपल्या पैकी बरेच जण नोकरी करत असतात. नोकरीत असताना आपला आपल्या सहकरी बंधुबरोबर वेळोवेळी संबंध येत असतो. एकमेकांना मदत करणे अडी अडचणीत धाऊन जाणे यामुळे कौटुंबीक स्नेहसंबंध निर्माण होताना दिसतात. मात्र या मैत्रीतील फार कमी संबंध हे कायम स्वरुपी टिकून रहातात. बरेच वेळा ही मैत्री ही तात्कालिक स्वरुपाची असते.नोकरीत बदली झाल्यावर किंवा निव्रूत्त झाल्यावर बहुधा हे मैत्री संबंध हळूहळू कमी होत जातात. फारच कमी लोकांच्या
बाबतीत अशी मैत्री पुढे टिकून रहाते व ज्याची मैत्री नोकरीतील बदली किंवा निव्रूत्त नंतरही पुढे टिकून रहाते असे लोक खरोखरच भाग्यवान म्हणले पाहीजेत.

मैत्री ही कोणत्याही प्रकारची असली तरी जिवनात मैत्री असणे हे फार महत्त्वाचे आहे. काही वेळा सुखदु:खाच्या काही घटना आपण आपल्या नात्यातील व्यक्ती बरोबर व्यक्त करु शकत नाही अशा वेळी मित्र ऊपयोगी पडतो व आपण आपल्या जिवनातील सुखदुःखे ही मित्रांसोबत व्यक्त करु शकतो.आपल्या एखाद्या चांगल्या वाईट प्रसंगी खरा मित्र आपल्या पाठीशी आधार बनुन उभा रहातो. तसेच जर आपण कोठे चुकत असलो तर तो अधिकार वाणीने आपली चुक दाखवून देऊन ती सुधारण्यासाठी मदत करतो. म्हणुन जिवनामधे एक तरी खराखुरा मित्र असावा कि जो आपल्या चांगल्या दिवसात तर साथ देईलच पण आपल्या कठीण प्रसंगात तो आपल्या पाठीशी खंबीरपणे ऊभा राहून आपला  आधार बनेल वआपले संपूर्ण जीवन आनंदमय करेल.

सुरेश काळे
मो. ९८६०३०७७५२
सातारा

Tuesday, 12 March 2019

सौंदर्य

सौंदर्य

सौंदर्य हा असा एक शब्द कि ज्याचा नुसता ऊच्चार जरी कानावर पडला तरी प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण होतात. आपण म्हणतोच की जितक्या व्यक्ती तितक्या प्रक्रुती. त्यामुळे प्रत्येकाची सौदर्याची व्याख्या वेगवेगळी असते. तसेच प्रत्येक व्यक्तीचा सौदर्य किंवा सुंदरतेकडे पहाण्याचा द्रुष्टीकोन वेगळा असतो.

सौंदर्य कशात नाही, या भुतलावरील प्रत्येक व्यक्ती प्राणी, निसर्ग या प्रत्येक ठिकाणी सौंदर्य ओतप्रोत भरले आहे फक्त तुमच्याकडे ते सौंदर्य ओळखण्याची नजर असली पाहिजे. लहान बाळाच्या प्रत्येक हालचाली मधे सौंदर्य असते ते आपण सुध्दा अनुभवू शकतो फक्त त्या साठी आपल्याला त्याच्या आईची नजर असली पाहिजे. तिच्या नजरेतून जर आपण पाहिले तर आपल्याला त्या लहान बाळात सौंदर्य दिसून येईल.

निसर्गाचा सौंदर्य अविष्कार पहायला तुमच्याकडे बालकविचे मन तशी द्रुष्टी हवी. त्यांच्या नजरेतून पाहील्यावरच आपल्याला फुलांचे सौंदर्य , फुलपाखरांचे मनमोहक रंग , जंगलातील विविध व्रुक्ष वाघ सिंहासारखे जंगली प्राणी, विविध पक्षी यांच्यात लपलेले सौंदर्य दिसून येईल व आपण त्याचा अनुभव घेऊ शकू.

आपण सर्वच ईश्र्वराची पुजा करतो नतमस्तक होत असतो त्या ईश्र्वराचे नामस्मरणात भजन किर्तनातील आनंद अनुभवायचा तर वारकरीच व्हायला हवे. पंढरपूर मधील त्या विठ्ठलाचे मुर्तीतील सौंदर्य , संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचे अभंगातील सौंदर्य तो वारकरीच अनभवू शकतो. त्या सौदर्याची अनुभूती घेण्यासाठी तो वर्षानुवर्ष न चुकता न थकता ऊन, वारा, पाऊस यांची कोणतीही काळजी न करता मैलोमैल अनवाणी चालत असतो.

आपणाला अशा प्रकारे वेगवेगळ्या सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी त्या त्या वेळी वेगळया भुमीकेत शिरावे लागते. तरच आपण त्यातील सौंदर्य अनुभवू शकतो. समुद्राच्या लाटांच्या आवाजात सुध्दा सौंदर्य असते त्या साठी समुद्राच्या सनीध्यात जायला हवे. नुसते चित्र किंवा सिनेमात समुद्र पाहून त्याचे सौदर्य समजू शकत नाही. सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीचे सौंदर्य अनुभवायचे तर स्टेडीयमवर जाऊनच त्याचा आनंद घेतला पाहिजे. टीव्ही वर पहायला कितीही छान वटले तरीही खरा आनंद प्रत्यक्ष पाहण्यातच आहे. पं.भिमसेन यांचे अभंगातील सौदर्य लुटायचे तर रेडिओ किंवा टीव्ही पेक्षा सवाई गंधर्व महोत्सवात सहभागी होणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे आपण आपल्या जिवनात विविध प्रकारानी सौंदर्याची अनुभूती घेऊ शकतो. फक्त त्यासाठी हवी योग्य द्रुष्टी आणी त्यात झोकून देण्याची प्रबळ ईच्छाशक्ती.

सुरेश काळे
सातारा