Friday, 15 March 2019

निवृत्ती

निव्रुत्ती

निव्रुत्ती हा शब्द आपण ऐकला की आपल्या समोर फक्त सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात २५ -- ३० वर्षे नोकरी करुन वयाची ६० वर्ष पुर्ण झाल्यामुळे त्या नोकरीतून मुक्त होणारी एक व्यक्ती ऊभी राहते. वास्तविक निव्रुत्तीमधे तेवढा एकच अर्थ अभिप्रेत नाही. खेळात अनेक वर्ष ऊत्तम कामगिरी केल्या नंतर सुध्दा एक ठराविक वय झाल्यावर खेळ जरी खराब होत नसला तरी वय परत्वे शारीरिक हालचाली मंदावतात व तरुण पणातील जोशपुर्ण खेळ त्या खेळाडुकडून होऊ शकत नाही व त्याला आपला खेळ थांबवावा लागतो. त्या वेळी तो खेळाडू ६० वर्ष झालेली व्यक्ती नसते.

आत्ता आपण ज्या निव्रुत्ती विषयी विचार करणार आहोत ती प्रामुख्याने सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी केल्या नंतर ठराविक वय ५८/६० पुर्ण केल्यामुळे नोकरीचा कालावधी समाप्त होऊन होणारी निव्रुत्ती. कोणीही व्यक्ती मग ती सरकारी क्षेत्रात असो किंवा खाजगी क्षेत्रात असो त्याला एक ना एक दिवस सेवा निव्रुत्त व्हावे लागते. नोकरीतील असलेल्या अधिकार पदानुसार वयात कमी जास्त होऊ शकते पण निव्रुत्त व्हावे लागतेच.

सर्व प्रथम प्रश्र्न येतो निव्रुतीचा विचार कधी करावा. त्याला ठराविक असे ऊत्तर नाही. पण मला विचाराल तर निव्रुत्तीचा विचार ज्या दिवशी आपण नोकरीत हजर होतो त्या दिवशीच करणे शहाणपणाचे ठरु शकते. विचार करताना पहिला मुद्दा येतो आर्थिक स्थैर्य. निव्रुत्तीनंतर आपण आर्थिक द्रुष्ट्या कोणावरही अवलंबून राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या बाबत विचार करताना आपणास निव्रुत्ती नंतर पेन्शन मिळणार आहे का नाही हे विचारात घेणे गरजेचे आहे. पेन्शन मिळणार असेल तर निव्रुत्ती नंतर बरेचसे प्रश्र्न सुसह्य होतात. तथापि ज्यांना पेन्शन मिळणार नसेल त्यांनी त्या बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्या द्रुष्टीने सुरुवाती पासुन नियोजन करणे योग्य ठरते. आपल्या मराठीत थेंबे थेंबे तळे साचे अशी म्हण आहे. त्या मुळे सुरुवात कितीही लहान प्रमाणात असली तरी ती वेळेवर सुरु करणे महत्वाचे आहे. त्या योगे आपण निव्रुत्ती पर्यंत योग्य नियोजन करून निव्रुत्तीनंतरच्या आयुष्याची तजविज करु शकतो व निव्रुत्ती नंतरचे आपले जिवन सुसह्य करू शकतो.

आर्थिक नियोजना नंतर पुढचा प्रश्र्न असतो शारीरिक स्वस्थ्य. वयाच्या साठी नंतर वय परत्वे येणारे आजार व त्यावरील ऊपचार याचा गांभीर्याने विचार करावा. रोज आपली दिनचर्या ठरवून शक्यतो त्या प्रमाणे दैनंदीन जिवन राहील्यास फारशा गंभीर तक्रारी निर्माण होत नाहीत. तसेच आपल्या डॉक्टरांना वेळचे वेळी भेटायला जाणे व त्यांचे सल्यानुसार वेळचेवेळी आवश्यक तपासणी व औषोधोपचार घ्यावेत. आपल्या आजारांचा बाऊ करू नये पण दुर्लक्षही करु नये. त्या मुळे आपण आपले आयुष्य आनंदाने घालवू शकू.

त्या नंतर सर्वात महत्वाचा विषय कौटुंबिक संबंध. आपण नोकरीत आयुष्यातील बराचसा कालावधी व्यतीत केलेला असतो व घरातील बरीचशी कामे पुर्ण करण्याची जबाबदारी आपल्या पत्नीने घेतलेली असते. निव्रुत्तीनंतर जी शक्य आहेत ती कामे आपण करून  आपल्या पत्नीचा कमाचा भार थोडा हलका करु शकतो व तो वाचलेला वेळ ती तिच्या आनंदासाठी व्यतीत करु शकेल त्यामुळे तिलाही थोडे समाधान मिळेल. मुले मोठी झालेली असतात. बहूधा त्यांची लग्न कार्य उरकलेली असतात. नोकरी निमित्त मुलगा त्याचे पत्नीसह वेगळ्या गावी रहात असेल तर त्याची वेळोवेळी विचारपुस करा त्याच्या अडचणीचे वेळी आवश्य हजर राहून शक्य होईल ती मदत करा. सल्ला विचारला तर आवश्य मोकळेपणाने आपले मत मांडा पण आपले मत त्यांचेवर लादू नका. आपल्या काळातील गोष्टींची तुलना करणे पुर्णपणे टाळा. कारण काळ बदलला आहे याचे सतत भान ठेवा. आपल्या काळातील एखादी चैनीची बाब आज गरज असू शकते त्यामुळे विनाकरण तुलना करून वाद निर्माण हैणार नाहीत याची काळजी घेतल्यास सर्व जण आनंदात राहू  शकतो. मुलीचे लग्न झाले असलेस वेळोवेळी तीची चौकशी करून आपण कायम तीच्या पाठीशी आहोत याची तिला तसेच तिच्या कुटुंबातील सर्वांना जाणीव अवश्य करुन द्यावी. पण शक्यतो तिचे संसारात अती हस्तक्षेप टाळणे ऊचीत होईल. त्यामुळे दोन्ही कुटुंबात चांगले स्नेहसंबंध निर्माण हैतील.

आता राहता राहतो प्रश्न आपला वेळ कसा घालवणे. आपल्या शरीराला वर्षानुवर्षे एक चाकोरीबध्द जिवन जगण्याची एक सवय लागलेली असते. साधारण निम्मे आयुष्य आपण एका ठराविक पध्दतीने घालवलेले  असते. त्यामुळे लगोलग त्यात बदल करणे सुरुवातीस निश्र्चीतच कठीण जाईल. त्यामध्ये प्रयत्न पुर्वक हळूहळू बदल करावा. आपले बरेच काही छंद आवडी असतात ज्यांना आपण नोकरी मुळे मुकलेलो असतो. आपण आपले मन आपल्या आवडीचे छंदात गुंतवल्याने आपणास आनंद तर मिळेलच आपला वेळही चांगला जाईल. सिनेमा, नाटक पहाणे , वाचन करणे यामुळे आपले मन आपणास प्रसन्न ठेवता येईल. वर्षातून एखादी छोटीशी सहल करुन आपल्या पत्नीसही आनंद देऊ शकतो.

निव्रुत्ती नंतरचे जिवनाचा विचार करताना अशा अनेक गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो. तथापि किमान वर उल्लेख केलेल्या बाबी जरी आचरणात आणल्या व त्या प्रमाणे प्रत्येकाने विचार करून योग्य ती काळजी घेतली तर आपले निव्रुत्ती नंतरचे जिवन आपण खचीतच आनंदात व सुखात घालवू शकू अशी प्रत्येकाने खात्री  बाळगण्यास हरकत नाही.

सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा.


No comments:

Post a Comment