Monday, 18 March 2019

बाजारु शिक्षण की शिक्षणाचा बाजार

बाजारु शिक्षण की शिक्षणाचा बाजार

नुकताच १० वी चा निकाल जाहीर झाला व बोर्डाच्या पोतडीतून एक एक विक्रमादित्य बाहेर पडू लागले. कोणाही मुलाला विचारले की आवाक करणारा आकडा ऐकायला मिळायचा. कोणाला ९५ तर कोणास ९७, ९८ % मार्क मिळाले होते. हे ऐकून आमच्या वेळचे मार्क आठवून असे वाटले की आताची नवीन पिढी आमच्या पेक्षा खुपच बुध्दिमान असावी व मला माझ्या एस.एस.सी. च्या मार्काची लाज वाटायला लागली.

वास्तविक तो एक भ्रम होता व लगेचच दोन दिवसात तो भ्रमाचा भोपळा फुटला. माझे एक स्नेही जे एक खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होते त्यांची रस्त्यात गाठ पडली पण ते नेहमी सारखे मोकळेपणाने बोलत नव्हते. बरेच वेळा खोदून विचारल्यावर म्हणाले चल जरा हॉटेलमध्ये चहा घेऊ मग सांगतो. आम्ही हॉटेलमध्ये जाऊन चहाची ऑर्डर दिली पण अजूनही त्यांची अस्वसथता जात नव्हती शेवटी मी म्हणालो अरे प्रॉब्लेम्स काय आहे ते तरी सांग म्हणजे काही मार्ग निघू शकेल.

त्यावर त्यांनी जे सांगितले ते ऐकून अक्षरशः डोके चक्रावून गेले. त्यांचा मुलगा नुकताच १२ वी सायन्स पास झाला होता व त्याला मिळालेल्या गुणांमुळे ते पुरते निराश वाटत होते. मुलाला १२ वी मधे ६२% मार्क मिळाले होते मेडिकल एन्ट्रन्सलाही असेच मार्क होते , सीईटी मधे तर असे मार्क की ईंजीनिअरींगचे दरवाजे बंद झाले होते. मी त्याला अनेक पर्याय सांगितले की त्याला, बी. फार्मसी , प्लेन बी.एस.सी. करु दे. त्यानंतर सुधदा त्याला एम.एस.सी. पी.एच.डी. करता येईल तसेच आवड असल्यास तो रिसर्च करु शकेल. तसेच पदवी नंतर तो एम.बी.ए. करु शकतो त्यामुळे तो एखाद्या चांगल्या रासायनिक किंवा औषधनिर्माण कंपनीत करीअर करु शकेल. एम.बी.ए. नंतर तो एखाद्या बँकेत अधिकारी म्हणून सुध्दा ऊत्तम करीअर करु शकतो.

असे वेगवेगळे पर्याय मी सुचवित होतो पण माझ्या मित्राच्या ते काही फारसे पचनी पडले होते असे वाटले नाही. त्यामुळे माझ्या पर्यायावर त्याने काही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. कारण त्याच्या डोक्यात मुलाला डॉक्टर करायची जी क्रेझ होती ती त्याला वस्तुस्थिती मान्य करण्यापासून दूर नेत होती. नंतर आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला व मी घरी आलो. घरी आल्यावर पुढील ४ ते ५ दिवस मीही अस्वस्थ होतो. मित्राच्या हट्टापायी मुलाचे नुकसान होऊ नये असे राहून राहून वाटत होते. मला दोन वर्षांपूर्वीची घटना स्पष्ट आठवत होती. हा मुलगा त्यावेळी ८२% गुण मिळवून १० वी पास झाला होता. त्याच्याशी बोलताना तो कला व वाणीज्य विषयांवर बोलत होता. त्याच्या एकंदरीत बोलण्यावरून त्याला शास्त्र शाखेची फारशी आवड नसल्याचे दिसत होते व तो वाणिज्य शाखेकडे जाईल असेच वाटत होते. त्यानंतर आमची बरेच दिवसात गाठ पडली नव्हती. व मीही ही गोष्ट विसरून गेलो त्यानंतर जेव्हा मित्राची गाठ पडली त्यावेळी मुलाने ११वी सायन्स ला प्रवेश घेतल्याचे समजले व थोडे आश्र्चर्य वाटले. पण मी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. व आज आता ही परिस्थिती की पाच लाख डोनेशन व वार्षीक सहा लाख फी भरून खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली. खाजगी मेडिकल कॉलेजमधील शिक्षणाचा दर्जा काय असतो व तेथे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अनुभव किती मिळतो हा विषय त्याहून वेगळा. यानंतर पाच वर्षांत तो मुलगा डिग्री घेऊन बाहेर येईल. कारण इतकी फी घेणारी कॉलेज मुलांना नापास करतच नाहीत. तेथील व्यवहार उघड आहे डोनेशन, भरपूर फी मोजा व डिग्री मिळवा. पण जेव्हा तो मुलगा डिग्री मिळाल्यावर प्रत्यक्ष जिवनात डॉक्टर म्हणून करिअर सुरू करेल त्यावेळी जी ऊत्कृष्टशै क्षणिक करिअर असणाऱ्या डॉक्टर लोकांशीत्या ला स्पर्धा करावी लागेल त्यावेळी तो त्या स्पर्धेत कितपत टिकाव धरेल हा मोठा गहन प्रश्न उभा राहतो.

वरील ऊदाहरण हे  सर्व विद्यार्थी व पालकांनाही विचार करावा असेच आहे.मुळात आपली सध्याची शिक्षणपधदती व परीक्षा पध्दतीचा विचार करायला हवा. ईयत्ता १० वी च्या परीक्षेची काठींण्य पातळी किती आहे. त्यातून खरोखर मुलांच्या बुध्दीमत्तेचा कस लागतो का. १० वी परीक्षेत मिळणारे गुण हे खरोखर त्या विद्यार्थ्याचे किती व त्यात शाळेचा हातभार किती हे सर्व विचारात घेणे गरजेचे आहे. याचा कोणताही विचार न करता मेंढराप्रमाणे सर्व विद्यार्थी शास्त्र शाखेत प्रवेश घेतात. बरेच वेळा असे दिसते की पालकच पाल्याला शास्त्र शाखेत प्रवेश घेण्यासाठी जबरदस्ती करतात. १० वी पास १५ वर्ष वय असलेला मुलगा स्वतः कोणताही निर्णय घेत नसतो तर बहुतांश वेळा पालकांचा निर्णय पाल्यावर लादला जातो. त्याची आवड काय आहे, कोणत्या विषयात त्याला चांगली गती आहे याचा जराही विचार केला जात नाही.

आता पालक तरी असे का वागतात याचा विचार केला तर त्याला विविध कारणे आढळून येतात . त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्यांची स्वताची अपुर्ण महत्वाकांक्षा. जे आपण करु शकलो नाही ते आपल्या पाल्याने करावे ही सुप्त ईच्छा पालकांना त्यांचा निर्णय पाल्यावर लादण्यास भाग पडते. त्या नंतरचे कारण म्हणजे तुलना. माझ्या शेजारच्या घरातील, माझ्या भावाचा ,बहीणीचा , आणी त्यहून महत्त्वाचे म्हणजे माझ्या हाताखाली काम करणाऱ्याचा पाल्य ईंजीनिअरींगचे किंवा मेडिकलचे शिक्षण घेतोय तर मग माझाही पाल्य डॉक्टर ईंजीनीअर झाला पाहिजे.

ईंजीनिअरींगची सद्यस्थिती काय आहे, किती जणांना चांगला जॉब मिळतो याकडे कोणाचेही लक्ष दिसत नाही. दरवर्षी लाखांच्या घरात मुले ईंजीनीअर होतात पण त्यातील मोजक्या व सर्वोत्तम अशा साधारण १० % मुलांना चागल्या मोठ्या संस्थेत मोठ्या पगाराची नोकरी मिळते बाकीचे ९० % विद्यार्थी १०००० ते १२००० पगारावर राबत असतात. व बरेच वेळा त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा त्यांच्या कामाशी काहीच संबंध नसतो. अशावेळी त्या मुलांची मनस्थिती काय होत असेल याचा विचार करण्याची कोणीच तसदी घेत नाही. माझा मुलगा किंवा मुलगी ईंजीनीअर अथवा डॉक्टर झाल्याच्या आनंदात सर्वजण मश्गुल असतात. एखादा कमकुवत मनाचा विद्यार्थी नैराश्याने ग्रस्त होऊन त्याचे आयुष्य बरबाद होऊन जाते याचा कोणी विचारच करत नाही.

मेडिकल क्षेत्र तर त्याहून कठीण. डॉक्टर झाल्यावर त्या क्षेत्रात जम बसायला किती कालावधी लागु शकतो हे कोणीही सांगू शकत नाही. ज्या पाल्याचे आई किंवा वडील या क्षेत्रात असतील त्यांना थोडे जम बसणे सुलभ जाते. अन्य सर्वांना फार कठीण परीस्थीतीला सामोरे जावे लागते. परत नुसती एक पदवी पुरेशी नसते पुन्हां कोणत्या तरी एक विभागात पदव्युत्तर शिक्षण घेऊन प्रावीण्य मिळवावे लागते. काही सरकारी महाविद्यालय  वगळता ईतर संबंधित महाविद्यालये शिक्षणाचा बाजार मांडून बसलेली आहेत . तेथे आवश्यक सोई सुविधांची सुध्दा वानवा असते अशा संस्था विद्यार्थ्यांना व पालकांना आर्थिकद्रुष्ट्या पिळून काढताना दिसतात.

त्यामुळे  खरोखरच वरील सर्व वस्तुस्थिती विचार करायला लावणारी आहे. त्याला आपली शिक्षण पध्दती व त्याही पेक्षा १० वी ची परीक्षा व गुणदान पध्दती मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे असे वाटते. त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आपला पाल्य खुप हुशार असल्याचे भासते व ते कुवतीबाहेरील क्षेत्रात विनाकारण गुरफटून जातात. सायन्स वितीरीक्त ईतरही शाखेत चांगले करिअर करता येऊ शकते हे आता कोणीतरी पटवुन देण्याची नितांत गरज आहे. याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करावा व आपल्या पाल्यावरील अनावश्यक ताण कमी करुन एक नवीन सुद्रुढ युवा पिढी निर्माण करावी त्यातच आपल्या देषाचे ऊज्वल भविष्य आहे असे वाटते.

सुरेश काळे
मो. ९८६०३०७७५२
सातारा

No comments:

Post a Comment