५०१ पाटी
सध्याचे युग हे जाहिरातीचे युग म्हणून ओळखले जाते. आपण रेडीओवर रोज विविध प्रकारच्या जाहिराती पहात असतो किंवा टी.व्ही.वर रोज नवं नवीन जाहिराती पहात असतो. पण एक काळ असा होता की जाहिरात म्हणले की प्रिंट मिडिया वृत्तपत्र ,मासिक अथवा अन्य मुद्रीत प्रकार हा एक उपाय होता किंवा एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी मोठा जाहिरात फलक लावण्यात येत असे व पेंटर त्यावर त्या उत्पादनाची माहिती लिहीत असे. हा जाहिरातींचा फलक महत्त्वाच्या रस्त्यावर अथवा चौकात लावला जात असे. काही दिवसांनी त्या जाहिरात फलकावर अन्य एखाद्या उत्पादनाची जाहिरात केली जात असे. पण एखाद्या ठिकाणी एका ठरावीक उत्पादनाची जाहिरात वर्षानुवर्षे केली जाऊन त्या जागेला विशीष्ठ जाहिरातीच्या नावाने ओळखले जाण्याचे भारतातील किंवा जगातील एकमेव ठिकाण म्हणजे सातारा येथील ५०१ पाटी.
साताऱ्यात महत्त्वाचे दोन रस्ते एक खालचा रस्ता व एक वरचा रस्ता वरच्या रस्त्याला राजपथ असे म्हणले जाते. राजपथावरील देवी चौक येथून जाणारा रस्ता जेथे खालच्या रस्त्याला मिळतो त्या चौकाला ५०१ पाटी किंवा ५०१ चौक असे संबोधले जाते. आत्ता या घडीला जर आपण तेथे गेलात तर तेथे अशी कोणतीही पाटी अस्तीत्वात नाही. पण तरीही त्या चौकाला ५०१ पाटी असेच संबोधले जाते.
माझ्या आठवणी प्रमाणे तो १९६५ ते १९६८ चा काळ असावा त्यावेळी कपडे धुण्यासाठी डिटर्जंट पावडर वा तत्सम प्रकारचे साबण अस्तीत्वात यायचे होते. त्याकाळी कपडे धुण्यासाठी एकमेव प्रसिद्ध साबण म्हणजे ५०१ साबण बार. साधारण लांबी १० ईंच असावी. त्यावर प्रत्त्येक एक ते दीड ईंचावर खुण केलेली असायची व वापरणाऱ्याने त्याला जशी पाहिजे तशी कापून वडी कापून घ्यायची. काही छोटे दुकानदार एक वडी कापून सुध्दा विकत देत असत. तर अशा या साबणाची जाहिरात तेथे एका मोठ्या फलकावर करून तो उंच करून लावलेला असायचा. ऊन अथवा पावसाने काही दिवसांनी त्या जाहिरात फलकावरील अक्षरे खराब होत मग पुन्हा पेंटर तिथे शिडी लावून नव्याने पेंटींग करत असे. व मग ती पाटी पुन्हा दिमाखात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत असे. वर्षानुवर्षे हा परिपाठ सुरु होता. त्यामुळे तो चौक व ती पाटी हे समीकरण इतके घट्ट झाले की त्या चौकाला लोकांनी ५०१ पाटी असे नाव दिले. त्या काळात कोणाला तिथे जायचे असल्यास ५०१ पाटीकडे चाललोय असं आपोआप म्हणले जायचे.
कालौघात कपडे धुण्यासाठी विविध प्रकारचे डिटर्जंट साबण व पावडर बाजारात आल्या. धुण्यासाठी मशीन आले व एक काळ गाजवलेला ५०१ साबण सुध्दा काळाच्या पडद्याआड गेला. त्या जागेवर आता ती पाटी सुध्दा नाही पण तो चौक व त्यारुपाने ५०१ पाटी हे नाव मात्र सातारच्या इतिहासात अजरामर झाले हे नक्की.
सुरेश काळे
मो. ९८६०३०७७५२
सातारा
No comments:
Post a Comment